कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर शहरात आज दुपारी अचानक आलेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. संध्याकाळ सुमारास विजांच्या गडगडाटासह पावसाला सुरूवात झाली आणि पाहता पाहता जोरदार पावसाने शहराला झोडपले.
मुसळधार पावसामुळे शहरातील विविध सखल भागांत व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, रंकाळा परिसर, टाऊन हॉल रोड, व्हिनस काॅर्नर, सी. बी. एस., महाद्वार रोड आदी ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. काही भागांत तर पाण्याची पातळी दीड ते दोन फूटांपर्यंत पोहोचली. यामुळे दुचाकीस्वार आणि पादचारी नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागले.
विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा जोरही प्रचंड होता. काही ठिकाणी झाडांची व फलकांची पडझड झाली. विजेच्या तारा तुटल्याने काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या ताफ्याने तातडीने काम सुरू करून वीजपुरवठा पूर्ववत केला.
महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने युद्धपातळीवर काम सुरू केले असून, नाले सफाई व पाणी उपसण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी अनावश्यक ठिकाणी फिरणे टाळावे व सुरक्षित ठिकाणी थांबावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातही या पावसाचा परिणाम दिसून आला आहे. काही भागांत शेतजमिनींमध्ये पाणी साचले असून उभ्या पिकांना फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
——————————————————————————————