कुरुंदवाड : अनिल जासुद
शिरोळ तालुक्यात मिरचीचे चांगले उत्पन्न मिळते म्हणून यावर्षी शेतकऱ्यांनी मिरचीचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले आहे. गतवर्षी उन्हाळी मिरचीच्या पिकाचे चांगले उत्पादन निघाले होते. दरही चांगला मिळाला होता. यामुळे यावर्षीही बहुतांशी शेतकरी मिरची पिकाकडे वळला आहे. तर काहीनी आंतरपिक म्हणून ही मिरची पीक घेतले आहे.
मिरची हे एक महत्वाचे मसाले पिक असून भारतीय आहारात तिचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. यामुळे मिरचीला वर्षभर मागणी असते. मिरचीचे पिक कोणत्याही हंगामात ( उन्हाळा,पावसाळा,हिवाळा ) घेता येते. मिरचीला नियमित पाणी देणे आवश्यक असते. मात्र, पिकात जास्त पाणी साचून चालत नाही.
मिरचीचे पिक हे सर्वसाधारण चार महिन्याचे असते. यासाठी एकरी उत्पादन खर्च साधारणतः एक ते सव्वा लाख येतो. यातून चार महिन्यात सुमारे ५ ते ६ लाखांचे उत्पन्न मिळते. मिरचीची ५० दिवसानतंर तोड सुरु होते, नियोजनानुसार खत व्यवस्थापन,औषध फवारणी,रोग प्रतिबंधक उपाययोजना केल्यास एकरी १५ टन उत्पादन मिळते.
सध्या चांगल्या हिरव्या मिरचीला बाजारपेठेत प्रतिकिलो ७० ते ८५ रुपये दर मिळत आहे. शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे निकृष्ठ टोमँटोच्या रोपामुळे शेतकर्यांना लाखोंचा अर्थिक फटका बसला आहे. येथील शेतकर्यांना उत्पादन खर्च लाखात करून, उत्पन्न हजारातही मिळाले नाही.
टोमँटोनतंर आता मिरची पिकावरील थ्रीप्स रोगांमुळे मिरची ऊत्पादक शेतकर्यांना मोठा अर्थिक फटका बसला आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.
आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रीय पध्दतीने शेती करुनही सध्याच्या हवामानातील बदलाचा सर्वच पिकावर परिणाम दिसून येत आहे. यामुळे शेतकर्यांना मोठ्या अर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. शेतकरी असा एकमेव वर्ग आहे, जो कितीही नुकसान झाले तरी त्याला ते सहन करुन परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी पुन्हा पुन्हा लढावे लागते. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी शेतकर्यांना सर्व संकटावर मात करुन पुन्हा धडपडावे लागतेच. याशिवाय त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो – महावीर पोमाजे, भाजीपाला उत्पादक, आलास, ता.शिरोळ
—————————————————————————————



