देशभरात मतदार यादींची सखोल फेरतपासणी

स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

0
150
Google search engine

मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत असतानाच, देशपातळीवर निवडणूक प्रक्रियेला अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. Special Intensive Revision (SIR) अर्थात विशेष सखोल फेरतपासणी प्रक्रिया आता संपूर्ण देशभरात राबवली जाणार असून, त्याचा थेट परिणाम आगामी महापालिका व ग्रामपंचायत निवडणुकांवर होणार आहे.
या प्रक्रियेचा प्रारंभ बिहारमध्ये प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आला होता. सध्या ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, बिहारचे राज्य निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार ९९ टक्के मतदारांना या मोहिमेत समाविष्ट करण्यात आले आहे. प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे काम सध्या वेगाने सुरू असून, हा अनुभव देशभरासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
मतदारांसाठी महत्त्वाची तारीख – १ सप्टेंबर
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, १ सप्टेंबर २०२५ पर्यंत कोणताही मतदार, नागरिक अथवा राजकीय पक्ष मतदार यादीतील चुकीच्या नोंदी, नाव वगळल्याचा किंवा चुकीच्या नावाच्या समावेशाचा दावा किंवा आक्षेप नोंदवू शकतो. त्यामुळे सध्याच्या घडीला मतदारांना सजग राहणे अत्यंत आवश्यक आहे.

या प्रक्रियेमुळे काय होणार ?
  • बोगस, मृत किंवा स्थलांतरित मतदारांचे नाव यादीतून वगळले जाईल
  • नवे पात्र मतदार यादीत समाविष्ट होतील
  • चुकीची माहिती सुधारली जाईल
  • मतदार यादी अधिक अचूक, विश्वासार्ह आणि पारदर्शक बनेल
महाराष्ट्रावर संभाव्य परिणाम
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यामुळे, विशेषतः महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आयोगाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मतदार यादीतील बोगस नावे हटवल्यास काही राजकीय पक्षांचे गणित बदलू शकते. मतदारसंघातील मतांची संख्या कमी-जास्त होणे, नव्या मतदारांचे उदय होणे आणि जुने प्रभाव गमावणे अशा अनेक राजकीय घडामोडींवर या प्रक्रियेचा थेट प्रभाव पडू शकतो.
राजकीय पक्षांची चिंता आणि तयारी
सध्या सर्वच पक्ष महायुती, महाविकास आघाडी आणि इतर स्थानिक घटक पक्ष निवडणुकीच्या मोर्चेबांधणीत गुंतले आहेत. मात्र, मतदार याद्यांमध्ये होणाऱ्या संभाव्य बदलांमुळे प्रत्येक पक्षाला नव्याने आपली रणनिती ठरवावी लागणार आहे.
मतदार यादी म्हणजे निवडणुकीचा कणा. SIR प्रक्रियेमुळे निवडणुकीतील पारदर्शकतेला अधिक बळकटी मिळणार असून, मतदार आणि प्रशासन यांच्यातील विश्वास वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनीही सजग राहून आपल्या नावाची पडताळणी करणे गरजेचे आहे.

आमच्या यू ट्यूब चॅनेललाही भेट द्या…👇


Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here