मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग असलेल्या दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. यंदा १.५० लाख गोविंदांना “ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी”तर्फे विमा संरक्षण दिले जाणार असून, यासाठी १ कोटी १२ लाख ५० हजार रुपये इतक्या रकमेचा विमा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
मागील वर्षी १.२५ लाख गोविंदांना हे संरक्षण देण्यात आले होते. परंतु काही गोविंदा यापासून वंचित राहिले होते. त्या त्रुटीचे गांभीर्य ओळखत, या वर्षी विमा संरक्षणाची मर्यादा वाढवून १.५० लाख गोविंदांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी या योजनेला तात्काळ मंजुरी दिली आहे. या योजनेची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी केली होती.
विमा संरक्षणाचे स्वरूप आणि लाभ
गोविंदांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत अपघातानुसार वेगवेगळ्या स्वरूपात आर्थिक भरपाई देण्यात येणार आहे
-
मृत्यू झाल्यास : गोविंदाच्या दुर्दैवी मृत्यूची घटना घडल्यास कुटुंबीयांना १० लाख रुपयांची भरपाई मिळणार.
-
पूर्ण अपंगत्व : दोन्ही डोळे किंवा दोन्ही हात/पाय गमावल्यास १० लाख रुपये.
-
अंशतः अपंगत्व : एक डोळा, एक हात किंवा एक पाय गमावल्यास ५ लाख रुपयांची भरपाई.
-
वैद्यकीय उपचार : मानवी मनोऱ्यादरम्यान झालेल्या दुखापतीसाठी १ लाख रुपयांपर्यंतचा उपचार खर्च विम्याअंतर्गत मिळणार.
योजनेची अंमलबजावणी कशी होणार?
या विमा योजनेसाठी “दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, मुंबई” यांचा प्रस्ताव शासनाने मान्य केला आहे. संपूर्ण विमा हप्ता राज्य सरकार स्वतः भरणार आहे.
विमा संरक्षणासाठी “महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन” च्या माध्यमातून गोविंदा पथकांची नोंदणी व आवश्यक कागदपत्रे सादर केली जातील. त्यानंतर संबंधित गोविंदांना संरक्षण कवच लागू होईल.
या वर्षीचा दहीहंडी उत्सव १६ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. उत्साह, स्पर्धा आणि चैतन्याने भारलेला हा उत्सव सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक बळकट करण्याचा प्रयत्न यंदा शासनाकडून केला जात आहे. गोविंदांची सुरक्षितता आणि प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे. उत्सवाचा आनंद घेतानाच अपघातांची भीती न वाटता, गोविंद आता अधिक आत्मविश्वासाने सहभागी होऊ शकतील.
————————————————————————————