करवीर नगरी अन् करवीर महात्म्य हे शब्द जेव्हा आपल्या कानी पडतात. तेव्हा तेव्हा करवीर निवासिनी आई अंबाबाई आणि दख्खनचा राजा जोतिबांची नाव आपसूकच लक्षात येतात. चैत्र महिन्यात जोतिबा देवाची मोठी जत्रा भरते. एखादा भाविक जोतिबा डोंगरावर येतो अन् तो यमाई देवीचं दर्शन न घेताच परततो हे क्वचितच घडतं. आई अंबाबाईच्या विनंतीवरून केदारलिंग अवतारातील जोतिबा देव डोंगरावर थांबले. पण, ते आले तेव्हा त्यांची बहिण मानली जाणारी यमाई देवी तिथे नव्हत्या. मग त्या तिथे कशा आल्या. त्यांच मंदिर आणि त्यांच्या मंदिरावर असलेल्या एका चित्राबद्दल आपण माहिती घेऊयात.
यमाई देवीची मंदिर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत. परंतु, औंध मधील मंदिर मूळपीठ आहे. यमाई देवीचे देवस्थान औंधच्या दक्षिणेस असलेल्या डोंगराच्या माथ्यावर निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहे. इकडे केदारनाथ वाडी रत्नागिरी डोंगरावर विराजमान होते. तेव्हा दक्षिण मोहिमेत केदारनाथ व औंदासुर राक्षसाची समोरासमोर भेट झाली. औंदासुराचा वध यमाई देवीच्या हाताने लिहीला होता. त्यामुळे औंदासुराला स्वत: न मारता जोतिबा देवांनी बहिणीला ‘यमाई’ म्हणजेच आई प्रमाणेच असलेली माई तू आता धाव, अशी साद या भावाने बहिणीला घातली. तेव्हापासून यमाई देवी असेच मान दृढ झाले. हा सर्व प्रसंग साताऱ्यातील औंध गावीच झाला. औंदासुराचा वध यमाई देवींनी केला. त्यामुळे त्या गावाला त्या दैत्याचे नाव पडते. औंधच्या कंठगिरी या डोंगरावर मूळ माया यमाईदेवी औंधासुराचा निःपात करण्यासाठी या ठिकाणी प्रगट झाली म्हणून या कंठगिरीचे नाव मूळगिरी झाले.
केदारनाथांची दक्षिण मोहीम पार पडल्यानंतर ते परत हिमालयाकडे जाण्यास निघाले. त्यावेळी महालक्ष्मीने विनवणी करून वाडी रत्नागिरी डोंगरावर गादी स्थापन करून त्यांचा राज्याभिषेक केला. या सोहळ्यास महालक्ष्मी यमाई देवीस बोलविण्यास विसरल्या. याची जाणीव चोपडाई देवीने केदारनाथांना करून दिली . तेव्हा केदारनाथांनी यमाई देवीचा रुसवा काढला. काही वर्ष उलटल्यानंतर यमाई देवीस वाईट वाटले. त्या केदारनाथांना म्हणाल्या, तुम्ही आता औंधकडे येऊ नका, मीच वाडी रत्नागिरी येथे चाफे वनात प्रकट होईन. त्याप्रमाणे यमाई देवी चैत्र महिन्यात वसंत ऋतूत या डोंगरावरील उत्तरेकडील चंपक वनात प्रकट झाल्या.
पुढे केदारनाथ चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या यात्रेत नित्याप्रमाणे लवाजम्यासह यमाई देवीस भेटण्यास गेले. ही होती यमाई देवींची कथा. पण आता आपण अशी एक वेगळी कथा पाहणार आहोत. जी बहिण-भावाच्या प्रेमाची साक्ष देते. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात कधी आला असाल तर एखाद्याला चुकून पाय लागला तर पाया पडतात. हे पाहिलं असेल. त्यावर प्रत्येक भागात वेगवेगळी कथा आहेच. पण, तुम्हाला माहितीय का की, पश्चिम महाराष्ट्रात असा काही प्रसंग झाला, चुकून एखाद्याला पाय लागला तर पाया पडण्यास सांगतात.
बहिण-भावाच्या प्रेमाची साक्ष देते हे मंदिर.
आजीच्या तोंडातूनही अनेकदा ऐकलं असेल की, पाया पड नाहीतर पायात किडे पडतील. तर हाच नेमका प्रसंग यमाई देवीच्या मंदिरात आहे. होय, यमाई देवीच्या मंदिरामागे असलेल्या भित्तीचित्रांमध्ये एक बहिण-भावाच्या पायातील किडे काढत बसलेल चित्र आहे. त्याची कथा अशी की, एकदा एका भावाने बहिणीला लाथ मारली. त्यावर बहिणीने त्याला शाप दिला की तू ज्या पायाने मला मारलंस त्याच पायात किडे पडतील. पण, भाऊ ताठ होता त्याने बहिणीची माफी मागितली नाही. उलट तो तिच्या शापाची चेष्टा करू लागला. पण, काही दिवसात जेव्हा खरंच भावाच्या पायात किडे पडले तेव्हा तो रडू लागला, ताईची माफी मागू लागला.
तेव्हा बहिणीला त्याची दया आली आणि ती स्वत:च्या मांडीवर पाय घेऊन भावाच्या पायातील किडे काढू लागली. या मंदिरावर आणखीही चित्रे आहेत. ती चित्रे जगभरात महिलांचा सन्मान आदर करावा, यासाठी रेखाटली गेली असल्याचे पुजारी सांगतात. यमाई देवीच्या मंदिरात नवे जोडपे देवीच्या दर्शनासाठी येते. तेव्हा ते देवीला आवडणारे मीठ अन् पांढरे भाकरीचे पिठ अर्पण करते. तसे करणे शुभ मानले जाते. तर, सौभाग्यवती स्त्रिया मंदिराच्या मागे खडकांचा मनोरा उभा करतात.
———————————————————————————————