उंडवडी : विशेष प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभरातील लाखो भाविकांचा ओसंडून वाहणारा भक्तिसागर पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. “याची देही याची डोळा” हे स्वप्न उराशी बाळगून, वारकऱ्यांची मांदियाळी आपल्या माऊलीच्या भेटीसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही पंढरीकडे निघाली आहे.
आज सकाळी वरवंड मुक्कामानंतर तुकोबारायांच्या पालखीने प्रस्थान ठेवलं असून, आजचा मुक्काम उंडवडी येथे होणार आहे. पाटसहून उंडवडीकडे जाणाऱ्या मार्गावर प्रसिद्ध असलेल्या रोटी घाटातून आज पालखीचा प्रवास होणार असल्याने वारकऱ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. रोटी घाट हा नागमोडी वळणांचा, चढ-उतारांचा अवघड मार्ग असून, यासाठी तुकोबांच्या पालखीला नेहमीपेक्षा अधिक बैलांच्या जोड्या लावण्यात आल्या आहेत. सामान्यतः दोन बैलांच्या जोड्या असणाऱ्या या पालखीला आज सहा बैलांच्या जोड्यांची साथ लाभली आहे.
फुलांनी सजवलेली तुकोबारायांची पालखी, भगव्या पताका हाती घेतलेले वारकरी, कधी टाळ-मृदंगाच्या नादात नाचणारे भाविक, तर कधी तुळशी वृंदावन घेतलेल्या माऊलींच्या ओळी, हे दृश्य डोळ्यांचे पारणं फेडणारं ठरत आहे. “ज्ञानोबा माऊली तुकाराम”च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हालून निघाला आहे.
दुसऱ्या बाजूला, ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज वाल्हे येथे मुक्कामी आहे. दोन्ही पालख्यांचा प्रवास ठरलेल्या परंपरेनुसार आणि भक्तिभावाने सुरळीत सुरू आहे.
पंढरपूरच्या वारीत सहभागी होणं हे केवळ परंपरेचे पालन नसून, तो एक अध्यात्मिक अनुभव आहे, असं वारकरी सांगत आहेत. पंढरीच्या दिशेने चालणाऱ्या या वारीचा शिस्तबद्धपणा, भक्तिभाव, सामूहिकता आणि आनंद यामुळे प्रत्येकाचं मन भारावून जातं.
पुढील प्रवास :
-
तुकोबांच्या पालखीचा पुढील मुक्काम उंडवडी
-
ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा मुक्काम वाल्हे
पंढरपूर वारीचा हा प्रवास केवळ अंतर कापण्याचा नव्हे, तर आत्म्याला माऊलीच्या चरणाशी नेण्याचा आहे.
——————————————————————————————