“शासनाची ही वागणूक म्हणजे अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता”! ; रोहिणी खडसे प्रदेशाध्यक्षा (महिला)राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)

0
64
Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर

राज्यातील बहुचर्चित लाडकी बहिण योजना संदर्भात सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)च्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी जोरदार टीका केली आहे. आतापर्यंत तब्बल 1.05 कोटी महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याचा आरोप करत सरकारचा दुटप्पीपणा उघड झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारवर हल्लाबोल केला. सध्या विधिमंडळात महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणावर चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री भाषणं करत आहेत, मात्र प्रत्यक्षात सरकारने आतापर्यंत 1.05 कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले, ही सरकारची दुटप्पी भूमिका असल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला.

त्या म्हणाल्या की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना सुरू करण्यात आली, त्यावेळी सुरुवातीला 2.53 कोटी महिलांना लाभार्थी म्हणून दाखवण्यात आले होते. या योजनेसाठी सुरुवातीला 45 हजार कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले होते. मात्र तपासणीनंतर संभाव्य पात्र लाभार्थ्यांची संख्या 1 कोटी 48 लाख 60 हजार इतकी राहिली आहे. तर 2026-27 च्या अर्थसंकल्पात केवळ 26 हजार 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे 1.05 कोटी महिलांना अपात्र ठरवण्यात आले, असा दावा त्यांनी केला.

निवडणुकीच्या वेळी सरसकट महिलांना पैसे देण्यात आले, मात्र निवडणुका जिंकल्यानंतर हळूहळू लाडक्या बहिणींवरचे सरकारचे प्रेम कमी होत असल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात गॅस टंचाई निर्माण होऊ लागल्याचा इशारा देखील रोहिणी खडसे यांनी दिला. मुंबई, पुणे आणि परिसरात गॅसच्या अभावी हॉटेल्स व खानावळी बंद पडू लागल्याची माहिती त्यांनी दिली.

मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. गॅस टंचाईची परिस्थिती गंभीर झाली तर विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. परिस्थिती आटोक्यात आली नाही तर घरगुती गॅसचाही तुटवडा निर्माण होऊ शकतो, असे त्या म्हणाल्या.

सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ तोडगा काढावा. आवश्यक असल्यास केंद्र सरकारशी चर्चा करून उपाययोजना कराव्यात, अन्यथा विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही रोहिणी खडसे यांनी दिला.

 

 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here