तिटवे : कृष्णात चौगले
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली या खेडेगावात तयार होणारी खवा बर्फी सध्या राज्यातील स्थानिक बाजारपेठेत आपल्या खास चवीनं आणि गुणवत्तेनं स्थान मिळवत आहे. “ठिकपुर्ली बर्फी” हे नाव आता केवळ स्थानिक नव्हे, तर अनेक शहरांतील ग्राहकांच्या जिभेवर रेंगाळू लागले आहे.
ग्रामीण भागात शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. याचेच संधीत रूपांतर करीत राधानगरी तालुक्या तील ठिकपुर्ली गावाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अतिरिक्त दुधाचा वापर करीत प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली खवा बर्फी आता जिल्ह्यांसह पर जिल्ह्यांतही ठिकपुर्ली ची दूध बर्फी म्हणून प्रसिद्ध झाली आहे.ठिकपुर्लीची ही मधुर चव आता कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासगाथेत एक नवा स्वाद भरत आहे.
एकेकाळी हे ठिकपुर्ली भाजीपाल्याचे गाव म्हणून पंचक्रोशीत ओळखले जात होते. गावाला नदी नाही पण दर्जेदार पद्धतीचा भाजीपाला पिकवला जातो. त्याला सांगड म्हणून हा बर्फी व्यवसाय सुरू झाला. यामुळे गावाची आर्थिक उलाढाल वाढली आहे. दुधाच्या बर्फीची चवच न्यारी असून, जिल्ह्यासह परजिह्यांतील खवय्यांच्या जिभेवर ती कायमच रेंगाळत असते.
शुद्ध दुधापासून तयार होणारी ही बर्फी अत्यंत मऊसर, ताजी आणि रसायनमुक्त असून पारंपरिक पद्धतीने ती तयार केली जाते. गेल्या काही वर्षांत गावातील तरुण उद्योजकांनी बर्फी उत्पादनाचे लघुउद्योगात रूपांतर करत व्यवसायाचा विस्तार केला आहे. विशेष म्हणजे, ही बर्फी आता पुणे, मुंबई, ठाणे, नाशिकसह अन्य राज्यांमध्येही पाठवली जात आहे.
अनेकांच्या रोजगाराचे साधन : छोटी अर्थव्यवस्था
गेली ३३ वर्षे येथे खवा बर्फी तयार केली जात असून आता ती अनेकांच्या रोजगाराचे साधन बनली आहे. अतिरिक्त दुधापासून बनविलेल्या खवा बर्फीचा व्यवसाय आता या गावाबरोबर जिल्ह्यातील अनेक भागात सुरू झाला आहे. जिल्ह्यातील अनेक मध्यवर्ती ठिकाणी ‘ठिपकुर्लीची बर्फी’ या नावाने स्टॉल उभे राहत आहेत. तर या नावाने ग्राहकांकडून मागणी ही वाढत आहे.यामुळे अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.सध्य़ा दररोज एक लाख लिटर दूध या बर्फीसाठी लागत असून त्याप्रमाणात लाखोंची उलाढाल होत आहे.
गावातील बर्फी व्यावसायिक शरद बाबुराव मुगळे म्हणाले की, १९९७ पासून आम्ही या व्यवसायात आहोत.सुरुवातीला बर्फी घरी तयार करून गावोगावी सायकल वरून दुकानदारांना देत होतो. आठ लिटर दुधापासून हा बर्फी व्यवसाय सुरू केला होता. आता तो पंधरा ते वीस लिटर दूध आम्हाला नियमितपणे लागते. तसेच आम्ही ही बर्फी घरच्या पद्धतीने, कोणताही बनावटी स्वाद न वापरता तयार करतो. आज या बर्फीमुळे आम्हाला स्वतःचा व्यवसाय उभा करता आला, आणि गावात रोजगारही निर्माण झाला.”
बर्फी तयार करण्याची प्रक्रिया –




खवा बर्फी बनण्यामागे प्रचंड कष्ट आहेत. हा व्यवसाय जितका गोड तितकाच उष्ण झळांनी भरलेला आहे. या साठी प्रक्रिया विरहित शुद्ध, ताजे दूध वापरले जाते. चवीसाठी दुधात वेलदोडे व साखर योग्य प्रमाणात वापरण्यात येते. साधारणपणे दहा ते बारा लिटर म्हशीचे ताजे दूध एका घाण्या साठी वापरतात. दूध तापविण्यासाठी चुलीच्या भट्टीचा उपयोग केला जातो. एकवेळ जेव्हा दूध उकळवून आटविले जाते त्या एका वेळेला एक घाणा म्हणतात. दूध आटून बर्फी बनण्यास सुरुवातीला दीड ते दोन तास लागतात. दहा लिटर दुधाच्या एका घाण्यात साधारणतः १२० ते १४० बर्फीचे नग तयार होतात. आजच्या घडीला दररोज दीड हजार दुधाचा वापर होत असून एक लाख बर्फीचे उत्पादन घेतले जाते.
सण-उत्सवांच्या काळात बर्फीला मोठी मागणी असते. श्रावण महिन्यात उपवास असतात. त्यामुळे अशावेळी बर्फी सर्वत्र घेतली जाते. बर्फीची गुणवत्ता तितकीच चांगली टिकवून ठेवल्याने या बर्फीला ग्राहकांकडून मोठी मागणी आहे.
बफीं नाममात्र दरात एक नग खव्याच्या बर्फीची किंमत फक्त १२ रुपये आहे. तर ३६० रुपये हा किलोमागचा दर आहे.



