कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
अनेक कार्यालयीन कामांसाठी आधार कार्ड हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. आधार कार्ड संदर्भातच यूआयडीएआयने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आधार कार्ड बनवण्यासाठी किंवा जुने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी काही कागदपत्रे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२५-२६ या वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मात्र विदेशी नागरिकांसाठी नियम वेगळे असणार आहेत.
एका व्यक्तीसाठी एकच आधार कार्ड हा नियम करण्यात आला आहे. एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा अधिक आधार कार्ड असल्यास सुरुवातीचे आधार कार्ड वैध ठरवून नंतरची आधार कार्ड रद्द करण्यात येतील, अशी माहिती समोर येतेय.
भारतीय नागरिक, परदेशात राहणारे भारतीय, पाच वर्षांपेक्षा जास्त वयाची मुलं, दीर्घकालीन व्हिसावर भारतात राहणारे लोक, या नागरिकांसाठी हे नवे नियम असणार आहेत..
आधार कार्डसाठी आता हे कागदपत्र वैध असणार :भारतीय पासपोर्ट (ओळख, पत्ता, नातेसंबंध व जन्मतारीख यांसाठी मान्य), पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका, ड्रायव्हिंग लायसन्स, पेन्शन कार्ड, कोणतेही सरकारी प्रमाणपत्र, ही कागदपत्रे वैध असणार आहेत.
आधार कार्ड अपडेट कसे करायचे : आधार कार्ड अपडेट करण्यासाठी, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (युआयडीएआय) च्या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन किंवा आधार सेवा केंद्राला भेट देऊन ऑफलाइन अर्ज करावा लागेल. ऑनलाइन अपडेट करण्यासाठी, आधार क्रमांक आणि ओटीपी वापरून वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. पत्ता बदलण्यासाठी, ऑनलाइन अर्ज करावा, तर इतर बदलांसाठी आधार सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल.
नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी यासारखे तपशील अपडेट करता येतात. तर बायोमेट्रिक माहिती (फिंगरप्रिंट, आयरीस स्कॅन) अपडेट करण्यासाठी आधार सेवा केंद्राला भेट देणे आवश्यक आहे. अपडेट प्रक्रियेस ३० ते ९० दिवस लागू शकतात,. अधिक माहितीसाठी, युआयडीएआय च्या वेबसाइटला भेट द्यावी किंवा १९४७ वर संपर्क साधावा.