सिंधुदुर्ग : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कोईळ गाव परंपरेत आपले वेगळेपण जपून ठेवणारे गाव म्हणून राज्यभरात ओळखले जाते. महाराष्ट्रात प्रत्येक घराघरांत बाप्पाचे आगमन होत असताना, कोईळ गावाने मात्र गेल्या सहाशे वर्षांपासून आजवर जपलेली अनोखी परंपरा आजही कायम आहे.
गावातील कुणाच्याही घरी गणपतीचा फोटो, मूर्ती किंवा प्रतिमा ठेवली जात नाही. इतकेच नव्हे, विवाह समारंभातील लग्नपत्रिकेतही गणपतीचे चित्र छापले जात नाही. गळ्यात लॉकेट स्वरूपात गणेशप्रतिमा धारण करण्याची पद्धतही गावकरी पाळत नाहीत. त्यामुळे बाहेरच्या लोकांना अनेकदा गैरसमज होतो की, कोईळकर गणपतीला मानत नाहीत का ? पण प्रत्यक्षात गावकऱ्यांची श्रद्धा गणरायावर मनापासून असून, त्यामागचे कारण वेगळे आहे.
ग्रामस्थांच्या मते, गणेश हा विघ्नहर्ता आणि मंगलकारी देवता आहे. त्याची कुठेही विटंबना होता कामा नये. गणरायाचे पावित्र्य जपले गेले पाहिजे, या भावनेतूनच ही परंपरा सुरू झाली आणि शतकानुशतकांपासून गावकरी याचा निष्ठेने सन्मान राखतात.
‘ एक गाव – एक गणपती ‘ परंपरा
कोईळ गावाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे ‘एक गाव – एक गणपती ’. गावात स्वतंत्र घरी गणेशोत्सव न साजरा करता, सर्व ग्रामस्थ मिळून श्री स्वयंभू गजानन मंदिरातच हा सण साजरा करतात. या मंदिरातील काळ्या दगडाची गणेशमूर्ती चतुर्थीला सजवली जाते.
संपूर्ण गावातील ८० ते ९० घरांतील ग्रामस्थ मिळून ११ दिवस भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करतात. त्याआधी गावभर शिधा गोळा केला जातो. त्या शिध्यातून दररोज महाप्रसाद दिला जातो. त्यामुळे उत्सवाच्या दिवसांत संपूर्ण गावात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण असते.
गणेशोत्सवाबरोबरच मंदिराचा वर्धापनदिन दरवर्षी २८ ते २९ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. यावेळीही गावकरी मोठ्या श्रद्धेने उत्सवात सहभागी होतात. कोईळ गावाच्या या अनोख्या परंपरेला आज अवघा महाराष्ट्र कौतुकाने पाहतो. श्रद्धा, एकजूट आणि परंपरा यांचे हे अनोखे संगम म्हणून कोईळ गावाचा गणेशोत्सव राज्यभरात वेगळ्या ओळखीने जपला जातो.
———————————————————————————————