मुंबई : विशेष प्रतिनिधी
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या घरातील बेडरूम मध्ये पैशाने भरलेली बॅग असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना आपण प्रवासामधून आलो होतो आणि त्या बॅगेत कपडे होते अशी सारवासारव मंत्री संजय शिरसाट यांनी विधान भवन परिसरात बोलताना केली आहे. मात्र, पत्रकारांनी त्यांना बॅगेत पैसे दिसत असल्याचे दाखवून दिल्यानंतर मात्र त्यांनी या व्हिडिओत तथ्य नसल्याचे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आल्यापाठोपाठ व्हायरल झालेल्या या व्हिडिओने शिरसाट यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. या व्हिडिओ संदर्भात त्यांनी विधानभवनात आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला.
आपल्याकडील बॅगेत कपडे
मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, मी माझ्या बेडरूम मध्ये असताना कोणीतरी हा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामध्ये मी आणि माझा कुत्रा दिसत आहे. परंतु, मी प्रवासावरून आलो होतो आणि ती बॅग तिथे पडली होती त्या बॅगेत केवळ कपडे होते. संजय राऊत यांना आरोप करायला आता काहीही विषय उरला नाही म्हणून ते माझ्यावर असे आरोप करत आहेत. स्वप्ना पाटकर या महिलेचा छळ करणाऱ्या राउतांनी माझ्यावर असले आरोप करू नयेत. आधी स्वतःकडे पहावे आणि मगच इतरांवर टीका करावी असेही शिरसाट यावेळी म्हणाले.
व्हिडिओमध्ये तथ्य नाही
सदर व्हिडिओ पत्रकारांनी शिरसाट यांना दाखवला आणि या व्हिडिओमध्ये बागेत पैसे दिसत असल्याचे दाखवताच शिरसाट यांनी आपला पवित्रा बदलला. आपण जो व्हिडिओ मला दाखवत आहात त्याबद्दल मला माहिती नाही. आपण दाखवत असलेल्या व्हिडिओमध्ये तथ्य नाही, असा दावा शिरसाट यांनी केला.
———————————————————————————



