प्रसारमाध्यम डेस्क
राज्यात दोनच समविचारी पक्ष आहेत असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील सध्याच्या भूमिकेवर राऊतांनी अप्रत्यक्ष टोला लगावलाय का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्याचबरोबर त्यांनी, अमित शाहांकडे गांभीर्याने घेण्याची गरज नाही ,त्यांना नैराश्य आलं आहे”, असे वक्तव्य देखील केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत चर्चा होत आहे. नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या वर्धापनदिनावेळी उद्धव ठाकरे यांनी या युतीबाबत सकारात्मक वक्तव्य केले आहे. यातच आज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी “राज्यात दोनच समविचारी पक्ष आहेत”, असे वक्तव्य करून महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्न चिन्ह निर्माण केलं आहे. यामुळे महाविकास आघाडी टिकणार का? यावर आता महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरु झाली आहे.
अमित शाहांना गांभीर्याने घेऊ नका
काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खरी शिवसेना ही कुणाची आहे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिले आहे, असे वक्तव्य केले होते. त्याचा राऊतांनी आज समाचार घेतला. शाहांचे वक्तव्य हे महाराष्ट्राच्या अस्मितेची खपली काढण्यासारखे आहे. शिंदे गट हा अमित शाहांच्या मालकीचा आहे. अमित शाहांकडे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांना नैराश्य आल्याचा दावा राऊतांनी केला.



