spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeकलासाहित्यिकांची लेखणी ही शांतता व लोकशाहीचे समर्थन करणारी असावी : प्रा.कृष्णात खोत

साहित्यिकांची लेखणी ही शांतता व लोकशाहीचे समर्थन करणारी असावी : प्रा.कृष्णात खोत

कोनवडेत ‘मातोश्री’ राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्कार प्रदान

गारगोटी : प्रसारमाध्यम न्यूज

समाजाचे मूल्यभान ढासळत असताना, विचारवंतांचा आवाज अधिकच महत्त्वाचा ठरत आहे. आज नितीमूल्यांचा गळेकाप सुरू असताना, वर्तमानाचे प्रश्न सुटण्याऐवजी इतिहासाच्या ओझ्याखाली जनतेचे भान हरवत आहे. कधीकाळी राजेशाहीत लोकशाही जपणारे होते, तर आता लोकशाहीत राजेशाहीचे संकेत पाळणारे पुढे आले आहेत. त्यामुळे समाजात अंधारात हरवलेली, बहिरी शांतता पसरली आहे. अशा वेळी लेखक हा व्यवस्थेवर प्रश्न विचारणारा, लोकशाहीचा खंबीर उपासक असावा, तर साहित्यिकांची लेखणी ही शांतता आणि लोकशाहीचे समर्थन करणारी असावी, असे ठाम मत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रा. कृष्णात खोत यांनी व्यक्त केले.

कोनवडे (ता.भुदरगड) येथील राजश्री शाहू प्रबोधनीमध्ये मातोश्री रेखा दिनकर गुरव राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्यिक गोविंद पाटील होते तर साहित्यिक राजन कोनवडेकर व साहित्यिक प्रा.चंद्रशेखर कांबळे प्रमुख उपस्थित होते.

पुरस्कार समितीचे सदस्य साहित्यिक रवींद्र रेखा गुरव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी गोविंद पाटील, गजानन शिले व सुरेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. पुरस्कार मान्यवरांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व रोख दहा व पाच हजार रुपये मान्यवरांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले. 

                                                  -पुरस्कार प्राप्त मान्यवर-

साहित्यव्रती – सुरेश शिंदे ( फलटण ) , उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार – नांगरमुठी – लेखक पांडुरंग पाटील ( कोल्हापूर ),  उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार – थकीत एकूण गोषवारा – कवी गजानन शिले ( वाशिम ), उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार – झुरळ आणि इतर काहीबाही – लेखक प्रमोदकुमार अणेराव (भंडारा ),  विशेष पुरस्कार – सांजड ( कथासंग्रह ) – लेखिका – सुचिता घोरपडे ( पुणे ) 

यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गुरव, रेखा गुरव, सुभेदार विश्वास पाटील, शाळा समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटील, मुख्याध्यापक सदाशिव पाटील, स्नेहल पाटील, अनिल गुरव, तेजश्री गुरव, विलास पाटील, अशोक कांबळे, मंगल पाटील आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन साहित्यिक रविंद्र गुरव (पाचवडे) यांनी तर आभार समीर मुजावर यांनी मानले.
—————————————————————————————-

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments