सातारा : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
सातारा जिल्ह्यातील युनेस्को जागतिक वारसा स्थळ ठरलेल्या जैवविविधतेने नटलेल्या कास पठारावर जगातील सर्वात मोठा मानला जाणारा ‘ॲटलास मॉथ’ हा दुर्मिळ पतंग आढळून आला आहे. या शोधामुळे कास पठार आणि संपूर्ण सह्याद्री परिसरातील जैवसंपन्नतेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
निसर्गप्रेमी आणि अभ्यासक रवी चिखले यांनी हा दुर्मीळ पतंग पाहिल्याची नोंद केली आहे. निशाचर असलेल्या या पतंगाला रात्रीच्या वेळी दिव्याच्या प्रकाशाकडे विशेष आकर्षण असते. दालचिनी, पेरू आणि जांभूळ यांसारख्या झाडांवर तो अधिक प्रमाणात आढळतो. याआधी रायगड जिल्ह्यातील माणगाव, सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड येथेही त्याची उपस्थिती नोंदवली गेली आहे.
ॲटलास मॉथची वैशिष्ट्ये
-
रंग व आकार : बदामी, तपकिरी आणि लालसर छटांच्या मिश्रणात दिसणाऱ्या या पतंगाची पंखांची लांबी साधारण ११ ते २५ सेंटीमीटर असते. पंखांचे टोक सापाच्या तोंडासारखे भासते, ज्यामुळे तो शिकारी पक्षांना घाबरवून स्वतःचे रक्षण करतो.
-
नकाशाप्रमाणे नक्षी : पंखांवरील नाजूक रचना एखाद्या नकाशासारखी दिसते, त्यामुळेच त्याला ‘ॲटलास’ हे नाव देण्यात आले आहे.
-
शरीर रचना : या पतंगाला तोंड व पचनसंस्था नसते. सुरवंट अवस्थेत तो पुरेसे अन्न साठवतो आणि प्रौढ अवस्थेत अन्न घेऊ शकत नाही.
-
आयुष्य : प्रौढ पतंगाचे आयुष्य फक्त ५ ते ७ दिवसांचे असते. या काळात तो केवळ प्रजननावर लक्ष केंद्रित करतो. प्रजननानंतर नर पतंगाचा मृत्यू होतो.
-
प्रजनन प्रक्रिया : मादी एकावेळी १०० ते २०० अंडी घालते. १०-१४ दिवसांत सुरवंट बाहेर येतो, तो ३५-४० दिवस झाडांची पाने खातो. त्यानंतर २१ दिवस कोषावस्थेत राहून प्रौढ पतंग बाहेर पडतो.