कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
खांद्यावर भगवी पताका, कपाळी गोपी चंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळ, हाती टाळविळा, मुखी विठूनामाचा गजर,ग्यानबा तुकारामचा जयघोष………
मैलोनमैल मजल दर मजल करीत लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने वाटचाल करतात ते विठूरायाच्या दर्शनाची ओढ असते म्हणून…..
प्रत्येकाच्या मनात हाच भाव असतो की विठू माउली कोणत्याही रूपात आपल्याला दर्शन देईल …… कधीतरी भेटेल.
सगुण सावळे रुप मनोहर, सुकुमार मदनाचा पुतळा
विठ्ठल भावाचा भुकेला
भक्तीचा आपल्या आयुष्यात नक्कीच फुलवेल मळा ह्या आशेवर जगतो.
वारी घडायला मागच्या जन्मीचे पुण्य लागते
वारी घडायला मागच्या जन्मीचे पुण्य लागते. वारकरी होणं सोपं नाही…..
मागणं नाही, सांगणं नाही,नवस नाही, कृपा कर म्हणायला एवढा वेळ नाही. वीस एकवीस दिवस आपल्या घरापासून लांब राहायचे,मिळेल ते खायचं, जागा जशी मिळेल तिथे झोपायचं, अंघोळ कशी करायची,कपडे धुवायला मिळतील का? आणि कुठे धुवायचे ? असे रोजच्याच गरजा असलेले प्रश्न…
पायदुखेपर्यंत २५० कि.मी.चा प्रवास करून त्याचं दर्शन होईल का ह्याची खात्री नाही. मिळाले तर मुखदर्शन तेही पंधरा वीस फुटांवरून, पायावर दर्शन तेही काही सेकंद ….. नाही तर चक्क कळसाचे दर्शन घेण्यात धन्यता मानणारे वारकरी
वारीमध्ये चालणारा एक ते दीड लाख लोकांचा समूह म्हणजे एक फिरते गावच
बरं ह्या सोहळ्यात सहभागी व्हायचं आहे तर कुणाचं आमंत्रण, निमंत्रण काही नाही…… एरवी फुटकळ कार्यक्रमासाठी रितसर आमंत्रणाची वाट पाहणारे आपण. वारकरी असल्या आमंत्रणाची वाट न पाहता या सोहळ्यात सहभागी होतात.
ज्येष्ठ महिन्यातल्या कृष्ण पक्षात तुकोबा आणि माऊलींचे प्रस्थान होईल या एका घोषणेनंतर हा सोहळा चालू होतो. घरचंच कार्य असल्याप्रमाणेच ह्या सोहळ्यात सहभागी होतात. खरतर ज्याच्या नशिबात वारी असेल त्यालाच वारी घडते ……
एकेक टप्पा पार करत वारकरी पंढरपूरकडे मार्गक्रमण करत येतात. तो सोहळा आनंदायक, ऐश्वर्यसंपन्न असाच! हा अनुभवयाला केवळ माणसं नशीबवान असावी लागतात हे मात्र अगदी खरं! वारीमध्ये चालणारा एक ते दीड लाख लोकांचा समूह म्हणजे एक फिरते गावच………तरंगणारं एक मोठं गाव वीस एकवीस दिवस एकत्रित वावरताना ह्यांच्यात वाद विवाद, संवाद होतच असतील की! पण सगळं विसरून परत एकत्र मार्गक्रमण करत पुढे पुढे जायचं विठूमाऊलीचं दर्शन हेच प्रत्येकाच ध्येय असते.
कारण सगळीकडे वावरणारी माऊलीच असते, ज्ञानेश्वरी, गाथा पण माऊली, ती वाचणारी पण माऊली, पंक्तीत पाणी वाढणार माऊली, जेवणारी माऊली ……
देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई
सुखालाही आला या हो आनंदाचा पूर
पालखीत, दिंडीत वावरणारे सगळेच माऊली….. हौशे, नवशे, गवशे….अगदी…. एखाद्याची वस्तू जरी हरवली तरी माऊलींने नेली …. अशीच बोलण्याची पद्धत असणारा पालखी सोहळा…..
या परंपरेत आयुष्यात एकदा तरी सहभागी व्हायला हवं
ही महाराष्ट्रची वैभवशाली, ऐतिहासिक परंपरा आहे……. अश्या या परंपरेत आयुष्यात एकदा तरी सहभागी व्हायला हवं पण ज्याच्या नशिबात असेल त्यालाच जमेल….. पंढरीनगरी म्हणजे माहेर आणि भक्तवत्सल पंढरीनाथ-विठोबा, विठ्ठल, पंढरीनाथ महाराज, वेगवेगळ्या नावाची ही संतांची ‘विठूमाउली’! अशी ही पंढरीची वारी एकटयाने नव्हे, तर सगळ्यांसोबत करण्याची.
माणसाचे माणसाशी रक्तापलीकडचे नातं जोडणारी वारीच आहे
माणसाचे माणसाशी रक्तापलीकडचे नातं जोडणारी वारीच आहे…… वारकरी आणि पांडुरंगाचे नाते निखळ प्रेमाचे…….माऊली ,तुकोबा,नामदेवा चोखोबा, एकनाथ महाराजांच्याबरोबर आपल्या विठू माऊलीचे नाव घेण्यासाठी त्या विठूमाऊलीकडे केवळ प्रेमाचं मागणं मागण्यासाठी निघालेल्या साध्या भोळ्या भक्तांचा मेळा म्हणजे वारी…..
॥ रामकृष्ण हरी ॥
——————————————————————————–