कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर जिल्ह्यात सलग काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढू लागली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी केवळ तासाभरात दोन फूटांनी वाढल्याने नदीकाठच्या भागांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
यंदा जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच जिल्ह्यातील सात तालुक्यांत सरासरी पाऊस झाला आहे. परिणामी, नद्यांचं पात्र भरू लागले असून काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. कोल्हापूर शहरासह जयसिंगपूर, शिरोळ, नृसिंहवाडी, चिखली परिसरातील नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील करुळ घाटात सोमवारी सकाळी दरड कोसळली. यामुळे घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या असून अपघात टळला आहे. जिल्हा प्रशासनाने दरड हटवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केल्या असून काही तासांत मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
राधानगरी धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरूच आहे. धरणात जलसाठा झपाट्याने वाढत असल्याने विसर्गात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या प्रवाहात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. धरणाखालच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवल्या असून, पाणीपातळीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
- संततधार पावसाने पंचगंगा नदीची पाणी पातळी आज सकाळी दोन फुटांनी वाढली आहे.
- पंचगंगा नदीवरील रुई आणि इचलकरंजी बंधारा पाण्याखाली गेला आहे.
- कुंभी नदीवरील सांगशी बंधारा पाण्याखाली गेला आहे.
- राधानगरी धरणात पाणीसाठा ५४.७१ टक्के झाला आहे.
- राधानगरी धरणाचा विसर्ग वाढवून २५०० क्युसेक करण्यात आला आहे.
- कुंभी मध्यम प्रकल्पातून विद्युतगृहातून ३०० क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
- जिल्ह्यात सात तालुक्यात जून महिन्यातील पावसाची सरासरी ओलांडली आहे.
- दुसरीकडे, अलमट्टी धरणातून पंधरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
हवामान विभागाकडून पुढील ४८ तासांत कोल्हापूरसह घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
—————————————————————————————-



