शिरोळ : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
नांदणी मठातील भाविकांची लाडकी माधुरी (महादेवी) हत्तीण परत यावी यासाठी सुरु करण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला जबरदस्त जनसमर्थन लाभले असून, दोन लाख चार हजार चारशे एकवीस नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असलेले अर्ज आज भारताच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या अर्जांचे पूजन स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते नांदणी मठात भाविकांच्या उपस्थितीत पार पडले.
या पूजनप्रसंगी माजी आमदार ऋतुराज पाटील, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, संचालक शेखर पाटील, नांदणी बँकेचे चेअरमन आप्पासाहेब लठ्ठे, तसेच राहुल खंजिरे, शशिकांत खोत, विजय पाटील, विजय चौगले, सुदर्शन खोत, नितीन बागे यांच्यासह विविध मान्यवर, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे सर्व अर्ज आज दुपारी कोल्हापूरच्या रमणमळा पोस्ट ऑफिसमधून थेट राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे पाठविण्यात आले आहेत. यासाठी माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा एक खास शिष्टमंडळ तयार करण्यात आले असून, त्यांनी नांदणी मठात महास्वामीजींच्या हस्ते पूजन करून पत्रे राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आली.
माधुरी (महादेवी) हत्तीणीला काही दिवसांपूर्वी पोलिस बंदोबस्तात गुजरातच्या वनतारा रेस्क्यू सेंटरमध्ये हलवण्यात आले होते. मात्र, तिचे मठाशी आणि हजारो भाविकांशी असलेले श्रद्धेचे नाते तोडले गेले यामुळे संपूर्ण जिल्ह्यात नाराजीचा सूर उमटला. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी “महादेवी परत यावी” यासाठी ही स्वाक्षरी मोहीम हाती घेतली होती.
फक्त दोन दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यातील सव्वा दोन लाखांहून अधिक नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेत, “ माधुरी (महादेवी) नांदणी मठातच राहिली पाहिजे” असा ठाम संदेश दिला आहे. महादेवी ही केवळ हत्तीण नसून, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील धार्मिक श्रद्धेचा आणि सांस्कृतिक अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहे, असे भावनिक मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
भाविकांच्या या व्यापक आंदोलनामुळे प्रशासनासह न्यायव्यवस्थेलाही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आली आहे. आता हे स्वाक्षरी अर्ज राष्ट्रपतींकडे पाठवून भाविकांची भावना आणि न्याय मिळवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. पुढील टप्प्यात काय घडते, याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
——————————————————————————————-



