कोल्हापूर : प्रतिनिधी
शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मान्यता देण्यात आली आहे. कोल्हापूरमधील शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर विधानसभा निवडणुकीअगोदर शक्तीपीठ महामार्गाचं भूसंपादन थांबवण्यात आलं होतं. आज पुन्हा एकदा भूसंपादनाला मान्यता देण्यात आली आहे. शक्तीपीठ महामार्ग १२ जिल्ह्यांमधून जाणार आहे.महायुती सरकारचा शक्तीपीठ महामार्ग हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूसंपादनाला स्थगिती देण्यात आली होती. आता मात्र, भूसंपादन करण्यास महायुतीच्या सरकारनं पुन्हा मान्यता दिली आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील आणि स्वामिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ विरुद्ध संघर्ष सुरु राहील, असं म्हटलं.
सतेज पाटील काय म्हणाले?
लोकसभेच्या अगोदरपासून आमची मागणी ही आहे की गरज नसलेला महामार्ग करु नये. शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन कारण नसताना महामार्ग केला जातोय. शक्तीपीठं आहेत तिथं निधी द्यावं. 86 हजार कोटींचा खर्च करण्याऐवजी कंत्राटदारांची ८४ हजार कोटींची बिलं द्यावीत, असं सतेज पाटील म्हणाले. शक्तीपीठ करण्याचा हट्ट का करण्यात येतोय. महाराष्ट्रातील अनेक रस्ते खराब झालेले आहेत त्याला निधी द्यावा, असं सतेज पाटील म्हणाले.
रत्नागिरी नागपूर महामार्ग असताना या मार्गाचा आग्रह शासन का करतंय हे माहिती नाही. धाराशिव मधून फोन होता, पोलिसांनी मोजणीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना अटक केली जातेय. हा दडपशाहीचा प्रकार आहे. राज्य अगोदर कर्जात असताना 86 हजार कोटींचा बोजा सरकार का घेतंय हे कळत नाही, असं सतेज पाटील म्हणाले.
आम्ही सातत्यानं संपर्कात आहोत. १२ जिल्ह्यातील शेतकरी संपर्कात आहोत. एक दोन लोकांची मान्यता घेऊन हा महामार्ग सगळ्यांनाच मान्य आहे हे करणं चुकीचं आहे. आम्ही विकासाचे विरोधक आहोत. या रस्त्यानं सामान्य माणसाचा काय फायदा होणार नाही. आमची आंदोलनाची भूमिका उद्याच्या भविष्य काळात तीव्र राहील, रत्नागिरी-नागपूर महामार्गात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. परभणीत गेले होतो तिथल्या कुटुंबांच्या 25 ते 30 एकर जमिनी गेलेल्या आहेत. या रस्त्याची गरज नाही, असं सतेज पाटील म्हणाले.
रत्नागिरी -कोल्हापूर- नागपूर महामार्गाला लोकांनी विरोध केलेला नाही. महाराष्ट्रात अनेक राष्ट्रीय महामार्ग झाले त्याला लोकांना विरोध झालेला नाही. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पुराचं संकट आहे. शेतकरी भूमिहिन होणार आहेत, असं सतेज पाटील म्हणाले. या मार्गाची गरज अजिबात नाही, असं त्यांनी म्हटलं. पुणे मुंबई एक्स्प्रेस वे, पुणे कोल्हापूर सहापदरीकरण आहे त्याला लोकांनी विरोध केलेला नाही, असंही सतेज पाटील म्हणाले.
राजू शेट्टी काय म्हणाले?
महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजेच लुटारुंचं टोळकं आहे. या टोळक्यानं अशा प्रकारचा निर्णय घेतला असेल तर आश्चर्य वाटायचं कारण नाही. तो त्यांचा निर्णय आहे. शक्तीपीठाला विरोध करण्याचा निर्णय बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतला आहे. तो शक्तीपीठ कदापि होऊ देणार नाही. पोलीस बंदोबस्तात मोजणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पोलीस सुपारीबाजांसारखे वागत आहेत. पोलीस दडपशाही करत आहेत, असं राजू शेट्टी म्हणाले. शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन देणार नाही. गोफणी तयार करा, ड्रोन सर्व्हे करायला येईल तेव्हा गोफणीच्या दगडानं एक एक ड्रोन टिपून टाका, शक्तीपीठ कदापि होऊ देणार नाही, असं राजू शेट्टी म्हणाले.