
व्यायाम करण्यास वयाचे बंधन असत नाही. उलट व्यायामामुळे शरीर आणि मन प्रसन्न राहते. थकवा, आळस, निरुत्साह, आजारपण, औषधपाणी या बाबी व्यायामामुळे चार हात लांबच राहतात. अर्थात इतका उत्साह आवड असेल तरच टिकतो. याचे एक उत्तम उदाहरण आहे, नाशिकच्या जयंती काळे आज्जी. या आजींचे वय आहे फक्त ८० वर्षे. या आजीबाई नवतरुणींना लाजवेल इतक्या सफाईदारपणे आजही पोहतात. त्यांनी पोहण्याचे कोणतेही ठिकाण सोडले नाही. नदी, तलाव, विहीर, पाट, कालवा, खाडी अशा कोणत्याही ठिकाणी आई-वडिलांचा डोळा चुकवून त्या पोहल्या आहेत. पोहण्याच्या राष्ट्रीय स्पर्धेत आजीबाईनी अनेक बक्षिसेही मिळवली आहेत.
आजीबाईंची पोहण्याची सुरवात इयत्ता तिसरीपासून झाली. त्यांचे वडील नगरमध्ये उत्पादनशुल्क विभागात निरीक्षक होते. आजींच्या शाळेजवळच नदी होती. या नदीत शाळेतील मुले-मुली पोहायला जात होते. त्यांच्याबरोबर त्याही पोहायला शिकल्या. त्यांच्या मैत्रीणीना पोहण्याचा इतका नाद लागला कि त्या दुपारनंतर शाळा चुकवून नदीत मैत्रीणीसोबत त्याही पोहायच्या. हे शाळेतील शिक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी त्यांच्या वडिलांकडे तक्रार केली. तसेच एकदा नदीत पोहतानाही पकडले. घरी आल्यानंतर बेदम मारले. इतके होऊनही आजीबाई गप्प बसल्या नाहीत. त्यांचे पोहणे थांबले नाही. त्या आई-वडीलांचा डोळा चुकवून पोहायला जायच्या. त्यांच्या वडिलांची बदली होईल तिकडे त्या ठिकाणी कोणत्याही पाणवठ्यात आज्जी पोहायच्या. अगदी आजीबाईनी पाट, हौदही सोडला नाही. इतका आजीबाईना पोहण्याचा नाद होता. आज्जींच्या वडिलांची बदली वसईला झाली. त्यावेळी त्या १७-१८ वर्षाच्या होत्या. वसईच्या खाडीने आज्जीना आकर्षित केले. मग त्या गप्प कशा बसतील बरे! त्या खाडीतही पोहायला लागल्या.
आज्जींनी लग्न झाल्यानंतरही पोहणे सोडले नाही. त्यांचा विवाह शेतकरी कुटुंबातील मुलाबरोबर झाला. एकदा त्या सासूबाईसोबत त्यांच्या शेतात गेल्या होत्या. तेथे विहीर त्यांना दिसली. सासूबाई जरा पुढे गेल्यानंतर त्यांनी विहीरीत उडी मारली. त्या पोहायला लागल्या. सासूबाई घाबरल्या. आजीबाईनी सासुबाईना समजून सांगतले. ‘मला चांगले पोहता येते, मला खूप पोहायची आवड आहे.’ आजीबाई कुटुंब सांभाळून, शेती सांभाळून पोहतच होत्या. नंतर नंतर त्यांना घरातील लोकांचाही पाठींबा मिळू लागला. त्यांनी स्पर्धेत भाग घेणेही सुरु केले. त्यांनी स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन पदके मिळवली. आजीबाईनी देशभरातील स्पर्धा गाजविल्या. पंजाबमधील स्पर्धेत त्यांना सुवर्ण पदक मिळाले तेव्हा त्यांना ऑस्ट्रेलिया स्पर्धेसाठी बोलवण्यात आले. मात्र, घरातून परवानगी न मिळाल्याने आजी परदेशात स्पर्धेसाठी गेल्या नाहीत.
आज्जी आजही नाशिकमधील वीर सावरकर तलावात रोज सकाळी पोहायला जातात. साडी, डोक्यावर पदर ही त्यांची खास ओळख. त्या बोलक्या आणि हसऱ्या असल्याने जलतरण तलावातील सर्वांशी त्यांची खास ओळख आहे.
आज्जीना आपल्या पोहण्याच्या छंदाचा अभिमान आहे. त्या पोहण्याचे फायदे सांगतात. ‘मला पोहण्यामुळे कोणताही आजार नाही. कसलेही औषध नाही. कोणत्याही पदार्थाचे मला वावडे नाही. कोणताही पदार्थ मी पचवू शकते.’
आज्जीनी पोहणे स्वत:पुरते ठेवले नाही. सुना, नातवंडानाही पोहायला शिकवले. तसेच आजी तलावावरही इतरांना पोहायला शिकवतात.
खरोखर जयंती काळे आज्जीचा आदर्श घेण्यासारखा आहे. वयाच्या ८० व्या वर्षातही त्या नियमित पोहतात. आरोग्य सांभाळून आनंदात जगतात. पोहण्याच्या व्यायामाच्या संस्कारामुळे त्यांच्या पुढच्या पिढ्याही आरोग्यपूर्ण जीवन जगत आहेत.



