पन्हाळा : प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील माले येथील आषाढी एकादशी निमित्त मार्कंडेय ऋषींच्या पादुकांचे दिंडी सोहळ्याने श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाले. ही दिंडी दहा दिवस मुक्काम करणार असून अकराव्या दिवशी पंढरपुरात पोहोचणार आहे. या दिंडीचे हे १४ वे वर्ष असून यावर्षी या दिंडीत दोनशेहून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत.
करवीर महात्म्य केदार विजय या प्रमुख ग्रंथांमध्ये उल्लेख असणाऱ्या आणि दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या करवीर क्षेत्रांमधील पुरातन शिवालय क्षेत्र ज्या ठिकाणी पुराण प्रसिद्ध शिवभक्त ऋषी मार्कंडेयांनी वास्तव्य करून आपली शिवभक्तीज्या उच्च स्तरावर नेली त्या पन्हाळा तालुक्यातील माले येथून आषाढी एकादशीनिमित्त दर वर्षी मार्कंडेय ऋषींच्या पादुकांचे दिंडी सोहळ्याने श्री क्षेत्र पंढरपूरकडे रवाना होते. ६ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने महाराष्ट्रातून दिंड्या पंढरपूरकडे रवाना होत आहेत.
माले येथील मार्कंडेय ऋषींच्या पादुकांचे दिंडी सोहळ्याने श्री क्षेत्र पंढरपूरकडे रवाना झाली. टाळ मृदुंगाचा गजर करत मुखात विठ्ठलाचे नाव घेत खांद्यावर भगव्या पताका घेऊन ही दिंडी गावातून मार्गस्थ झाली. या दिंडी सोहळ्यामुळे गावातील वातावरण भक्तिमय झाले होते. यंदाचे हे दिंडीचे चौदावे वर्ष आहे. ही दिंडी दहा मुक्काम करून अकराव्या दिवशी पंढरपुरात पोहोचणार आहे या दिंडी सोहळ्यामध्ये माले, पोखले, केखले, आरळे, बहिरेवाडी,जाफळे, शहापूर आदी गावातील दोनशे हून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत.