कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
सलग सुट्ट्या आल्या की रस्ते हाउसफुल्ल होतात आणि वाहतुकीवर ताण पडतो. कारण अशा वेळी बहुतेकजन पर्यटनासाठीबाहेर पडतात. स्वातंत्र्यदिन, शनिवार आणि रविवारची आठवडी सुट्टी असा एकंदर योग साधून आल्या कारणानं नोकरदार वर्गापैकी बऱ्याचजणांनी गुरुवारचीसुद्धा सुट्टी घेत थेट शहराच्या बाहेरची वाट धरली आहे. यामुळं मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर गुरुवारी सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळताहेत. प्रामुख्यानं लोणावळा आणि खंडाळा भागांमध्ये येणारी पर्यटकांची गर्दी पाहता गुगल मॅपनंसुद्धा या रस्त्यांवर ‘लाल शेरा’ मारत त्या दिशेनं जाणाऱ्या वाहनधारकांना सतर्क केलं आहे.
एकिकडे चार चाकी खासगी वाहनांमुळं या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी असतानाच दुचाकीस्वारांनाही अशाच आव्हानांचा सामना करावा लागत आहे. साधारण 30 मिनिटं किंवा त्याहून अधिक वेळासाठी इथं वाहतूक कोंडी असल्या कारणानं अनेकांनीच अपेक्षित ठिकाणांवर पोहोचण्यासाठी पर्यायी वाटा शोधण्यास सुरुवात केली आहे.
गुरुवारीच मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर ही परिस्थिती असताना आता शुक्रवार, शनिवार आणि रविवारी हे चित्र आणखी बिघडणार असल्याचेच संकेत इथं मिळत आहेत. ज्यामुळं यंत्रणांनीसुद्धा नागरिकांना त्यांच्या येत्या दिवसांतील प्रवास वाहतुकीची स्थिती पाहूनच ठरवावा असंही आवाहन केलं जात आहे.
मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर असणाऱ्या टोल प्लाझांवर लांब रांगा लागत असून, फास्टटॅग असूनही वाहतूक व्यवस्थापनात अडचणी येत असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामुळं पर्यायी मार्गांनी प्रवास करणं प्रवाशांसाठी सोयीचं ठरणार आहे.
पर्यायी मार्ग असे :
पनवेल, गोवा, आणि जेएनपीटी कडे जाणाऱ्या वाहनांसाठी: कोनफाटा इथून पळस्पे सर्कलमार्गे नॅशनल हायवे-४८ वर वळावे. तळोजा, कल्याण, आणि शिळफाटा येथे जाणाऱ्यांसाठी पनवेल-सायन हायवेवर १.२ किमी जाऊन पेट्रोल पंपाजवळील उड्डाणपुलाखालून उजवीकडे वळून रोडपाली आणि नॅशनल हायवे-४८ मार्गे पुढे जाता येते. जुना पुणे-मुंबई मार्गानं शक्य असेल त्यांनी प्रवास करावा, मात्र इथंही गर्दी नाकारता येत नाही.