कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने आता थोडी विश्रांती घेतली असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सातत्याने झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शिवारात पाणी साचून राहिले होते. त्यामुळे उन्हाळी पिकांची काढणी आणि खरीप हंगामाच्या तयारीत अडथळा निर्माण झाला होता. मात्र, हवामानात बदल झाल्याने आता शेतकऱ्यांनी पुन्हा शेतीच्या कामाला सुरुवात केली आहे.
बहुतांश शेतकरी रोहिणी नक्षत्रावर पेरणी करण्याचा प्रयत्न करतात, कारण या काळातील हवामान पीक उगम आणि वाढीसाठी अनुकूल मानले जाते. परंतु यंदा अविरत पावसामुळे रोहिणीचा पेरा साधणे शक्य झाले नाही. सध्या पावसाने थोडी उसंत घेतली असली, तरी दिवसभरात एखाद-दुसरी सर पडत असल्यामुळे मशागतीची कामे पुन्हा पुन्हा थांबवावी लागत आहेत.
जिल्ह्यात खरीप हंगामाचे एकूण ३ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये भात, ज्वारी, नाचणी, सोयाबीन, भुईमूग, मूग, उडीद, तूर यासारख्या पिकांचा समावेश आहे. सामान्यतः मे महिन्यात पहिल्या पावसाच्या आगमनानंतर शेतकरी खरीप पेरणीसाठी शेतांची मशागत सुरू करतात.
सध्या शेतकरी पेरणीपूर्व तयारी म्हणून शेणखत टाकणे, शेतात पालापाचोळा जाळून राख तयार करणे, ती राख शिवारात पसरवणे, नांगरट करून शेतातील ढेकळे फोडणे, अशा कामांत व्यस्त आहेत. हे सर्व शेत शेतकरी पेरणीयोग्य बनवण्यासाठी आवश्यक असते. हवामान अनुकूल राहिल्यास पुढील आठवडाभरात पेरण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.
वाफसाच्या प्रतिक्षेत खरीप पेरणी –

मान्सूनपूर्व पावसामुळे जमिनीत खोलवर ओलावा गेला आहे. मात्र, या ओलाव्याचा खरा उपयोग वाफसा आल्यानंतरच होणार आहे. काही ठिकाणी शेतात पाणी तुंबलेले असल्यामुळे वाफसा यायला आणखी आठवडाभराचा अवधी लागणार असल्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. कृषी विभागाने यंदाच्या हंगामासाठी बियाणे आणि खतांचे पुरेसे नियोजन केले आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून गुणवत्ता असलेले बियाणे आणि आवश्यकतेनुसार खते खरेदी करावीत, असे आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
आठ ते दहा दिवस निर्णायक –
तज्ज्ञांच्या मते, पुढील आठ ते दहा दिवस पावसाचा व्यत्यय न झाल्यास खरीप पेरणीसाठी योग्य वातावरण निर्माण होईल. जमिनीत योग्य वाफसा आल्यास पेरणीला गती मिळेल आणि खरीप हंगामाचा मुहूर्त साधता येईल. या वर्षी भात, सोयाबीन, भुईमूग, नाचणी, ज्वारी यांसारख्या पारंपरिक पिकांसोबत काही शेतकरी भाजीपाला, मिरची, तुर, मूग अशा रोपवाटिकांनाही प्राधान्य देत आहेत.
यंदाचा पावसाळा वेळेआधी सक्रिय झाला असला, तरी त्याच्या सातत्यामुळे पेरणीवर परिणाम झालेला आहे. आता हवामान स्थिर राहून वाफसा लवकर आल्यास शेतकऱ्यांना खरीप हंगाम वेळेत हाताळता येईल. आता खरीपाचा खरा हंगाम सुरू होण्याची तयारी शेतकऱ्यांनी सुरु केली असून, अशीच उघडीप राहिल्यास शिवारे पेरणीसाठी गजबजून जाईल, अशी अपेक्षा आहे.
————————————————————————————-






