The original idol of Ambabai, the resident of Karveer Nivasini
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
आजचा दिवस करवीरनगरीसाठी सुवर्णाक्षरांनी नोंदवावा असा आहे. नेमके २६ सप्टेंबर १७१५ रोजी, छत्रपती शिवरायांचे नातू व छत्रपती राजाराम महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजीराजे (दुसरे) यांच्या काळात, एक शतकाहून अधिक काळ गुप्त ठेवलेली करवीरनिवासिनी अंबाबाईची मूळ मूर्ती पुन्हा मूळ मंदिरात विधीवत प्रतिष्ठापित झाली होती. छत्रपतींच्या स्थिर व सुरक्षित राजसत्तेचे ते प्रतीक मानले जाते.
पातशाह्यांच्या काळात आदिलशाहीच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर प्रांतात अस्थिरता व युद्धाचे सावट कायम होते. मंदिरांची नासधूस होण्याची भीती असल्याने अंबाबाईच्या पुजाऱ्यांनी देवीची मूळ मूर्ती कपीलतीर्थाजवळ गुप्त ठिकाणी लपवून ठेवली होती. स्वराज्य स्थापनेनंतर कोल्हापूर छत्रपतींच्या अखत्यारीत आल्यानंतर वेदशास्त्रसंपन्न नरहरभट सावगावकर यांनी पन्हाळगडावर छत्रपती संभाजीराजे यांची भेट घेऊन हा संपूर्ण वृत्तांत सांगितला. देवीच्या दृष्टांतानुसार मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना करावी, अशी विनंती त्यांनी केली.
महाराजांनी विनंती मान्य करून आपल्या सेनापती सिदोजी घोरपडे व हिंदूराव गजेंद्रगडकर यांना प्रतिष्ठापनेचे आदेश दिले. महाराजांच्या आज्ञेनुसार सन १७१५ मध्ये विजयादशमीच्या पवित्र दिवशी मोठ्या धार्मिक विधींसह मूर्तीची पुनर्स्थापना करण्यात आली. मूर्तीबद्दलची माहिती देऊन हे शुभकार्य घडवून आणल्याबद्दल छत्रपती संभाजीराजांनी नरहरभट यांना काही पेठा व वतने इनाम दिली, तसेच देवीच्या नित्य पूजाअर्चेसाठी सावगाव हे गाव इनाम स्वरूपात बहाल केले.
या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून करवीर मंदिरात आज विशेष सजावट करण्यात आली आहे. देवीच्या गाभाऱ्यात दीपमाळा, फुलांच्या तोरणांनी सजलेले प्रवेशद्वार, तसेच संपूर्ण परिसरात उत्सवमूर्तीचे वातावरण पाहायला मिळत आहे. भाविकांनी “अंबाबाईचा गजर” करत दर्शनासाठी मोठी गर्दी केली असून १७१५ च्या त्या दिवशी घडलेली ही पुनर्स्थापना आजही करवीरच्या इतिहासातील सुवर्णपान ठरली आहे.
संदर्भ : करवीर रियासत (पान २६४), सेनापती घोरपडे घराण्याची कैफियत