मुंबई : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज सोमवार, ३० जून रोजी मोठ्या गदारोळात आणि आक्रमक वातावरणात सुरुवात झाली आहे. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ‘मी मराठी’ च्या टोपी घालून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ठाकरे गटाचे आमदार, विरोधी पक्षाचे नेते आणि अन्य विरोधकांनी मराठी अस्मितेचा मुद्दा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गाजवत सरकारवर टीकेची झोड उठवली.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना ‘मी मराठी’ टोपी घालून दिली. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि बावनकुळे यांच्यात हस्तांदोलनही झाले. भास्कर जाधव, अजय चौधरी यांच्यासह अनेक आमदारांनी ‘मी मराठी’चा झेंडा हाती घेतला.
दरम्यान, विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित मंत्री छगन भुजबळ यांचा अधिकृत परिचय करून दिला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण संदर्भातील अध्यादेश पटलावर ठेवण्यात येणार आहे. तसेच २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीच्या पुरवणी मागण्याही सभागृहात सादर केल्या जातील. शोक प्रस्ताव मांडल्यानंतर आजचे कामकाज समाप्त होईल.
दुसरीकडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही विधानभवनात दाखल होण्याची शक्यता आहे. ते दुपारी २ वाजता आझाद मैदानावरील एका कार्यक्रमात सहभागी होणार असून, त्यानंतर तीन वाजता ते सिल्वर ओक निवासस्थानी देखील उपस्थित राहतील.
विरोधकांचा आक्रमक पवित्रा, ‘मी मराठी’चा गजर, नवनिर्वाचित मंत्र्यांचा शपथविधी, शक्तीपीठ महामार्ग, शेतकऱ्यांची कर्जमाफी, कुंभमेळा प्राधिकरणासारख्या महत्त्वाच्या विषयांमुळे यंदाचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याचे संकेत स्पष्ट झाले आहेत. पुढील काही दिवस विधानभवनात जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळणार हे नक्की
———————————————————————————–