देशात मान्सूनचा परतीचा टप्पा सुरू

अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा

0
161
Although the southwest monsoon is now slowly retreating, its influence remains in many states and the Meteorological Department has predicted heavy rains for the next few days.
Google search engine
पुणे : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

गेल्या काही महिन्यांपासून देशाला भिजवणारा नैऋत्य मान्सून आता हळूहळू माघारी फिरत असला तरी त्याचा प्रभाव अनेक राज्यांमध्ये कायम असून पुढील काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राजस्थान, गुजरात, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातून मान्सून माघार घेत असला तरी इतर भागांमध्ये अजूनही मुसळधार पाऊस आणि वादळी हवामानाचा धोका कायम आहे.

नवरात्रीपर्यंत अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून संबंधित भागांना हाय अलर्ट देण्यात आला आहे.

उत्तर भारत
१६ आणि १७ सप्टेंबर रोजी उत्तराखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पूर्व आणि मध्य भारत
बिहार, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस होण्याचा इशारा आहे. झारखंड, छत्तीसगड, पश्चिम मध्य प्रदेश, ओडिशा आणि विदर्भातही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार सरी येण्याचा अंदाज आहे. तसेच १७ ते २० सप्टेंबर दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांवर सतत पाऊस राहणार आहे.
पूर्वोत्तर भारत
आसाम आणि मेघालयमध्ये पुढील आठवडाभर सतत पावसाचा अंदाज आहे. नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये १६ सप्टेंबर ते १९ ते २२ सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर कायम राहू शकतो. मात्र, अरुणाचल प्रदेशाला सध्या तरी पावसापासून दिलासा मिळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दक्षिण भारत
तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि केरळच्या अनेक भागात १६ ते १९ सप्टेंबर दरम्यान हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस आंध्र प्रदेश आणि रायलसीमा भागांमध्ये ताशी ३०-४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
पश्चिम भारत
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यात १६ ते १८ सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच गुजरातच्या अनेक भागांतही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, नद्यांचे पाणी वाढणे, भू-स्खलन, वीज कोसळण्याचा धोका आणि वादळी वाऱ्यांपासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनीही पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मान्सून माघारी जात असला तरी येणाऱ्या काही दिवसांत हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे.
——————————————————————————————————
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here