कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील मठाची माधुरी (महादेवी) हत्तीण सोमवारी थेट वनतारा केंद्रात गेल्याने परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला आहे. यानंतर वनतारा विभागाने तातडीने कारवाई करत शुक्रवारी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात मठाचे महास्वामी, वन विभागाचे अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती.
मात्र, ही बैठक सुरु असतानाच महास्वामी अचानकपणे उठून तडकाफडकी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर पडल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर माध्यमांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, महास्वामींनी कोणताही प्रतिसाद देण्यास नकार दिला. त्यांच्या अचानक बाहेर पडण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र या प्रकारामुळे अनेक चर्चांना ऊत आला आहे.
दरम्यान, बैठकीच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नांदणी गावातील ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. ” हत्तीचं संरक्षण करा “, ” माधुरी ( महादेवी) ला वनतारात का ? ” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
वन विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले असून, हत्तीण माधुरी (महादेवीची) वनतारा केंद्रात नेमकी काय स्थिती आहे, यावर लवकरच अधिकृत माहिती देण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून मिळाले आहेत. या प्रकरणामुळे नांदणीतील वातावरण सध्या चांगलेच तापले असून, पुढील निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
—————————————————————————————-