-सुभाष महाजन, कोल्हापूर
बाराव्या शतकात लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर यांनी या विश्वाला दिलेली अनमोल देणगी म्हणजे लोकशाहीचे अधिष्ठान असलेली संस्था अर्थात अनुभव मंटप होय. आज आपल्या देशात समाज व राष्ट्र घडविण्यात महत्वाची भूमिका बजावणारी व्यक्ती म्हणजे भारतीय संसद होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्या राष्ट्राला लाभलेले अनमोल योगदान म्हणजे भारतीय राज्यघटना. डॉ आंबेडकरांची राज्यघटना आणि म. बसवण्णांच्या अनुभव मंटपाची नियमावली यांच्यामध्ये साम्य आहे.
स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि स्वावलंबन ही अनुभव मंटपाची चतुःसुत्री होती. प्रवेश देताना जात, धर्म, लिंग वय-संपत्ती, पद, सामाजिक प्रतिष्ठा यावर आधारित असा कोणताही भेद केला जात नव्हता, अनुभव मंटपाची प्रवेशास महत्वाची अट म्हणजे सभासदाची शिवा वर संपूर्ण निष्ठा असली पाहिजे. आपल्या मनातील ज्ञान, वर्ण, उच्च- निचता, श्रेष्ठ – कनिष्ठत्वाची भावना संपूर्णपणे नष्ट केलेली असली पाहिजे. चरितार्थासाठी कोणतेही कायक त्याने मनःपूर्वक स्विकारले असले पाहिजे. तसेच हे कायक सत्य, शुद्ध असावे व ते त्याने प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे.
अनुभव मंटप ही लोकशाही तत्वावर आधारलेली होती. या धर्मसंसदेमध्ये सामान्य माणसांचे प्रतिनिधी होते. तसेच विद्वान, धनिक जाणि अधिकारी पदावरील माणसेही होती. या सर्वांना शरण असे संबोधले जात होते. अनुभव मंटपाचे एकूण ७७० सभासद होते. त्यातील ७० स्त्रिया होत्या. हे सर्व सभासद एकत्रपणे चर्चा करीत असत. त्यात सर्वांनाच सहभागी करून घेतले जाई. या ठिकाणी धर्मचिकित्सा होत असे. जग, जीवन जगत, अध्यात्म, लोकव्यवहार, मानवता यावर या ठिकाणी मुक्तपणे चर्चा होत असे. शरणांच्या जीवनात घडलेली एखादी घटना आणि त्या अनुषंगाने शरणांनी कसे वागावे यावरही चर्चा होत असे. त्यात वादविवाद. मतभेद होत असत. प्रत्येक जण आपले म्हणणे हिरिरीने मांडत असे. स्त्रियांही यात मागे नव्हत्या. त्यातूनच वचने आकारास आली. त्यामुळे शरणांच्या अनुभव -विश्वाचे प्रतिबिंबही त्यांच्या वचनातून जाणवते. लोकशाहीचा जणू आदर्श म्हणजे ही धर्मसंसद्, अर्थात अनुभव मंटप होय.
लोकशाहीमध्ये लोकांचे हित महत्वाचे असते. नव्हे, लोकांच्या हितासाठीच या व्यवस्थेची निर्मिती केलेली असते. अनुभव मंटपाचा मुळ हेतू हाच होता. या भूतलावरील सर्व लोकांबद्दल प्रेम जिव्हाळा, सहानुभूती बाळगणे आणि त्यांचा उद्धार करणे हे अनुभव मंटपाचे मुख्य लक्ष होते. त्यामुळेच प्रजेच्या हितासाठी केवळ अध्यात्मिकच नाही, तर सामाजिक, आर्थिक, नैतिक, सांस्कृतिक, शैक्षणिक चर्चा करणे व त्यातून सर्वांगीण प्रगतीचे निर्णय सर्वानुमते होणे या गोष्टी घडत असत.
अनुभव मंडपाची मार्गदर्शक तत्वे अभ्यासल्यानंतर अनुभव मंटप व आजच्या आपल्या संसदेच्या लोकशाही मूल्यांच्या संदर्भातला समान दृष्टिकोन लक्षात येतो.
★ अनुभव मंटपाची मार्गदर्शक तत्वे :
१) स्त्री-पुरुष समान आहेत.
२) पुरुष पुरुष किंवा स्त्री-पुरुष यात कोणताही भेदभाव केला जाऊ नये.
३) स्त्रियांनाही पुरुषांप्रमाणे आपली प्रगती करून घेण्याचा आधिकार आहे.
४) कोणतीही व्यक्ती वर्ग, वर्ण, लिंग, जात, व्यवसाय भेदाने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नाही.
५) आपली व्यवसाय निवड प्रत्येकाने स्वेच्छेने करावी
६) स्त्रियांही आपल्या आवडीने अर्थार्जनाचे काम करू शकतात.
७) सर्व व्यवसाय प्रतिष्ठेच्या दृष्टीने समान आहेत
८) आपला व्यक्तिमत्व व्यवसाय आपल्या सत्य शुध्द कायकातून करावा.
९) ध्यान- धारणेसाठी, अध्यात्म साधनेसाठी सर्व संग परित्याग करण्याची गरज नाही.
१०) आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यात यावे.
११) अस्पृश्यतेला समाजात कोणतेही स्थान नाहीं
१२) प्रत्येक व्यक्तीला अध्यात्मिक आणि सामाजिक प्रश्नाबाबत मुक्त चिंतन करण्याची मुभा आहे.
१३) शिक्षणासाठी लोकभाषा हे उत्तम माध्यम आहे.
१४) सर्वांना अभिव्यक्ती, आचार-विचार व संचार स्वातंत्र्य आहे.
वरील मार्गदर्शक तत्त्वानुसार बाराव्या शतकातील अनुभव मंटप हे खऱ्या लोकशाही मूल्यांची जोपासना करणारे विचारपीठ होते असे मानावे लागेल.
या अनुभव मंटपाचे लक्षात घेण्यासारखे वैशिष्ट्य म्हणजे या संसदेचे अध्यक्षपद स्वतः बसवण्णांनी स्विकारलेले नव्हते. स्वतः संकल्पक आणि संस्थापक असतानाही त्यांनी अल्लमप्रभू नावाच्या एका विद्वान विचारवंताकडे हे अध्यक्षपद सोपविले होते. अल्लमप्रभूनी आपल्या विधायक विचारांच्या प्रचारासाठी भारतभर भ्रमण केले होते. ही व्यक्ती कोणी उच्चवर्णिय नव्हती, तर अस्पृश्य समाजात जन्माला आलेली परंतु , आपल्या बुध्दिमतेच्या जोरावर भारतभर सर्वमान्य झालेली अशी व्यक्ती होती. म्हणून त्यांना सन्मानाने पाचारण करून सर्वांच्या संमतीने या अनुभव मंटपाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. तसेच विविध स्तरातील लोकप्रतिनिधींच्या मार्फत अनुभव मंटपाच्या निर्णय प्रक्रियेत प्रजेला देखील सामील करून घेतले होते. थोडक्यात “लोकांनी लोकांच्यासाठी आणि लोकांच्याकडून घेतलेले निर्णय आणि चालविलेले राज्य ” अशी ही संकल्पना होती. अंमलबजावणीची अंतिम जबाबदारी शेवटी राज्य-यंत्रणेवर सोपविण्यात आलेली होती.
मः बसवण्णांचा हा प्रयोग संपूर्ण देशभर आणि काही प्रमाणात जगभर त्यावेळी चर्चेचा विषय ठरलेला होता. ज्यांना पटेल, रुचेल ते लोक या अनुभव मंटपाच्या प्रयोगाकडे आकर्षित होत होते. याचे एक लिखीत उदाहरण म्हणजे काश्मीरचा राजा भूपालसिंग आपल्या पत्नीसह दक्षिण भारतात येऊन या अनुभव मंटप संघटनेत सहभागी झाला होता. त्याला महात्मा बसवण्णांचा ‘कायकवे कैलास’ हा सिद्धांत इतका भावला की, त्यानंतर त्याने कष्ट न करता आयते अन्न न खाण्याची
शपथच घेतली आणि आपल्या पत्नीसह तेथेच झोपडी बांधून बुरुड काम करून तो आपले पोट भरू लागला. शेवटपर्यंत त्यांने हे वृत पाळले. त्यामुळे पूर्वीचे भूपालसिंग हे नाव मागे पडून तो पुढे ‘मोळीगे मारय्या या नावाने ओळखला जाऊ लागला. तसेच अफगाणिस्तानातून एक तरुण विचारवंत आलेला होता. त्याचे इथे आल्यानंतर बदललेलं नाव मरुळ शंकरदेव असे होत. प्रसादकुंडा जवळची सर्व कामे तो स्वतः करीत असे. त्याच्या नंतर त्या भागातून आणखी काही कार्यकर्तेही आलेले होते. असे कागदोपत्री पुरावे उपलब्ध आहेत.
नंतरच्या कालावधीत ख्रिश्चन धर्माच्या प्रचारासाठी येशूचे काही अनुयायी भारतात आलेले असताना दक्षिण भारतात म. बसवण्णांच्या अनुभव मंटप रुपाने ५० वर्षापूर्वी राबविलेली लोकसहभागाची संकल्पना त्या धर्मगुरुंना खूप आवडली. त्यावर से सखोल चिंतन करून आदर्श शासन व प्रशासनाचा एक चार्ट तयार केला आणि इंग्लंडचे तत्कालीन सम्राट ‘किंग जॉन’ यांना सादर केला. राजाने त्या चार्टला स्पष्ट नकार दिला. धर्मगुरु स्टिफन एंगस्टन बीशप यांनी एक लढाऊ सत्याग्रही संघटना तयार केली आणि या लढ्यात आम जनतेलाही सामावून घेतले व राज्यसत्येलाच आव्हान दिले- शेवटी सिंहासन टिकवून ठेवण्यासाठी राजाने लोक–सहभागाचा तो चार्ट पाहून त्यात काही बदल सुचविले. शेवटी राजा-राणी आणि प्रजा यांच्या समन्वयाचा हा चार्ट १५ जून १२१५ रोजी किंग जॉनच्या दरबारात एक मताने मंजूर झाला आणि इंग्लंडमध्ये पार्लमेंटरी डेमॉक्रसी अर्थात खऱ्या अर्थाने लोकशाही अस्तित्वात आली.
जगाच्या इतिहासात त्यावेळेपासून ‘मॅग्नाचार्य’ हा लोकशाहीचा पहिला आराखडा किंवा चार्ट म्हणून नोंदला गेला. मॅग्नाचार्य म्हणजे लोकशाहीचा महान आराखडा होय. लोकशाहीचा हा प्रयोग प्रथम इंग्लंडमध्ये अंमलात आणला गेला, असा प्रचार केला जात असता तरी वस्तुस्थिती मात्र तशी नाही. त्यापूर्वी मंगळवेढ्यासारख्या मराठी मुलूख -मध्ये म. बसवांना हा विचार सुचला, रुचला आणि नंतर कल्याण नगरी मध्ये म्हणजे मराठीचे भाषाभगिनी असलेल्या कानडी भूमीमध्ये रुजला आणि हळूहळू सगळ्या भारतभर व कालांतराने जगभर पसरला.
लोकशाहीच्या प्रयोगाची खरी सुरुवात सत्यशोधक म. बसवण्णांनी केलेली होती-परंतु त्यांच्या अकाली महानिर्वाणामुळे हा राजकीय क्रांतीचा प्रयोग प्रतिगाम्यांनी प्रतिक्रांती करून बंद पाडला. त्यानंतर पन्नास वर्षानंतर इंग्लंड-मध्ये तोच प्रयोग सुरु झाला. तिथे मात्र तो आजपर्यंत अखंडपणे सुरू असल्यामुळे जगाच्या राजकीय इतिहासात इंग्लंड हे लोकशाहीचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांच्या नंतर चारपाचशे वर्षानंतर आमच्यावर राज्य करणाऱ्या त्यांच्यांच राजवटीत हळूहळू पुन्हा सुरु झालेला लोकशाहीचा अभिनव प्रयोग आपल्या राष्ट्रात त्यांच्यापेक्षाही प्रगत आणि व्यापक स्वरुपात आजही सुरु आहे.
महात्मा बसवेश्वरांकडून ब्रिटीशांनी लोकशाही – ची प्रेरणा घेतली असून त्यांच्याविषयी ब्रिटीशांच्या मनात आजही खरोखरच आदराची भावना आहे. याचा मुर्तीमंत पुरावा म्हणजे इंग्लंडमध्ये उभारला गेलेला म. बसवण्णांचा पुतळा होय. “बसवेश्वरांचा अनुभव मंटप हा १२ व्या शतकातील एक अनुकरणीय चमत्कार होता आणि त्यांचेच अनुकरण आपण व सगळे जग आज करीत आहे?” असे गौरव उद्गार लंडनच्या पार्लमेंटच्या सभापतींनी काढले.
म. बसवण्णांचे लोकशाहीच्या निर्मितीतील योगदान मान्य करून हा पुतळा त्यांच्या देशात सन्मानाने उभारण्यात आलेला आहे. याचाच अर्थ २१ व्या शतकातील इंग्लंडच्या राज्यकर्त्यांनी क्रांतीकारक बसवण्णांचे योगदान अमान्य केलेले नाही.
आज २१ व्या शतकात सर्व विश्वाला भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अनुभव मंटपातून निर्माण झालेल्या शरण संस्कृतीत मिळतात. त्या काळात शरणांनी जी नीतिमूल्ये निर्माण केली, ती आजही दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहेत. स्वातंत्र्य समता, बंधुता, न्याय व मानवाधिकार यांची जोपासना करणारा, अंतरंग – बहिरंग शुध्द असलेला चारित्र्यसंपन्न नागरिक घडविण्यासाठी या विज्ञान – तंत्रज्ञान युगातही अनुभव मंटपाची नितांत गरज आहे.
जन्मदिनानिमित्त म. बसवण्णांना विनम्र अभिवादन ।
——————————————————————————–



