कुरुंदवाड : प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील कृष्णा -पंचगंगेचे पाणी ओसरत असतानाच आज मंगळवारपासून कोयना धरणाच्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली आहे. विसर्गामुळे कृष्णेची पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
गेले चार दिवस पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. तसेच कोयना धरण वगळता सर्वच धरणातून करण्यात येणारा विसर्ग पुर्णतः बंद आहे. यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा – पंचगंगेचा पूर झपाट्याने ओसरत आहे. दोन्ही नद्यांचे पाणी पात्राकडे ओसरत आहे. दरम्यान पाणी पात्राकडे ओसरत असतानाच कोयना धरणाच्या पाणी साठ्यात सतत वाढ होत आहे. परिणामी धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज मंगळवारी दुपारी चार वाजल्यापासून कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटावरुन तीन फुटापर्यंत वर उचलण्यात आले आहेत. यातून २५,२०० क्युसेक व धरण पायथा विद्युत गृहातुन २१०० क्युसेक असा एकुण २७,३०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे.
विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिरोळ तालुक्यात कृष्णेचे पाणी पात्राकडे ओसरत असले तरी नृसिंहवाडी दत्त मंदिराला अजूनही पुराचा विळखा कायम आहे. कोयनेतून आजपासून वाढविण्यात आलेल्या विसर्गामुळे तो आणखी काही दिवस राहण्याची शक्यता आहे.