कास पठार दुर्मीळ फुलांनी बहरले

हंगामाला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
105
The season has begun on the Kaas Plateau, a World Heritage Site, and nature lovers are getting a breathtaking view of rare flowers here.
Google search engine
सातारा : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर हंगामाला सुरुवात झाली असून, निसर्गप्रेमींना येथे दुर्मीळ फुलांचे मनमोहक दर्शन मिळत आहे. पहिल्या टप्प्यात काही दुर्मीळ फुले उमलण्यास सुरुवात झाली असून, त्यामुळे अधिकृत हंगाम ४ सप्टेंबर पासून वनविभाग आणि कास कार्यकारी समितीच्या वतीने सुरू करण्यात आला आहे.

हंगाम सुरू होताच ऑनलाइन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी, आरक्षण न करता आलेल्या पर्यटकांची संख्याही मोठी आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी समितीने १३२ स्वयंसेवकांची नेमणूक केली असून, त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. पर्यटक मोठ्या संख्येने कासला भेट देत असून निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेत आहेत.

सध्या पठारावर टूथब्रश, दीपकांडी, आभाळी, सोनकी, तेरडा या दुर्मीळ फुलांचे तुरळक स्वरूपात दर्शन होत आहे. काही भाग पिवळ्या आणि लाल फुलांनी बहरला आहे. लाल-गुलाबी तेरडा, गेंद, सीतेची आसवे, चवर यांसारख्या फुलांनी पठारावर रंगांची उधळण केली आहे. तसेच कुमुदिनी तलावही फुलांनी नटला असून उर्वरित इतर फुलांना भर येण्यास सुरुवात झाली आहे.

पठारावर उतरणाऱ्या ढगांच्या चादरी, थंडगार वाऱ्याची झुळूक आणि अधूनमधून येणारा हलकासा पाऊस यामुळे पर्यटकांचा अनुभव अधिक संस्मरणीय बनला आहे. या नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत.

पर्यटकांनी पर्यावरणाची काळजी घेत स्वच्छता राखावी आणि प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, पर्यटकांनी http://www.kas.ind.in या वेबसाईटवर ऑनलाइन बुकिंग करूनच येण्याचे आवाहन वनविभाग आणि कास कार्यकारी समितीने केले आहे.

कास पठारावरचा हंगाम निसर्गप्रेमींसाठी आणि छायाचित्रकारांसाठी एक अप्रतिम अनुभव ठरत आहे. येथे निसर्गाच्या सौंदर्यात हरवून जाण्याचा हा सर्वोत्तम काळ मानला जात आहे.

————————————————————————————————
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here