पुणे : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यात अनेक भागांमध्ये सध्या पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र दिसत असून, मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने काहीशी माघार घेतली आहे. मात्र, विदर्भात मात्र पावसाचा जोर वाढण्याची चिन्हं आहेत, त्यामुळे हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
मुंबई व कोकण विभाग
मुंबईत सामान्यतः ढगाळ आकाश राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील अशाच प्रकारचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पुण्यात ढगाळ वातावरण राहून हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतही हलका पाऊस होईल, तर घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
मराठवाडा
मराठवाड्यात पावसाचा जोर सध्या कमी असून, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यांमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्याच पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र
नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये देखील ढगाळ हवामानासह हलका पाऊस पडू शकतो.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
विदर्भातील हवामान मात्र अधिक चिंताजनक आहे.
नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान विभागाने यासाठी यलो अलर्ट जारी केला असून, पुढील तीन ते चार दिवस विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
———————————————————————————