कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
गेली काही दिवस सुरू असलेले युध्दजन्य वातावरण आता निवळणार आहे. भारत व पाकिस्तानमधील युध्द आता थांबले आहे. तात्काळ युद्धबंदीवर भारत आणि पाकिस्तान ने सहमती दर्शवल्याचे दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांनी अधिकृतपणे घोषणा केली आहे. आज शनिवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून शस्त्रसंधीची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या युध्द बंदीच्या पोस्ट नंतर दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयानेही याला दुजोरा दिला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनीही पोस्ट शेअर करत याला दुजोरा दिला आहे. “पाकिस्तान आणि भारत यांनी तात्काळ प्रभावीपणे युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. सार्वभौमत्वाशी आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड न करता पाकिस्तानने नेहमीच या प्रदेशात शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले आहेत,” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत दोन्ही देशांनी थेट चर्चा केली. पाकिस्तानच्या डीजीएमओने आज दुपारी फोन सुरू केला, त्यानंतर चर्चा झाली आणि समझोता झाला. इतर कोणत्याही ठिकाणी इतर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विक्रम मिसरी यांनी दिली आहे.
पाकिस्तानच्या डीजीएमओने दुपारी साडेतीन वाजता चर्चेसाठी पुढाकार घेतल्यानंतर भारताच्या डीजीएमओशी बोलणं झालं. या चर्चेत दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारचे हल्ले रोखण्यावर सहमती झाली. दरम्यान १२ मे रोजी बारा वाजता पुन्हा एकदा चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
“भारत आणि पाकिस्तानने आज गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत एक सामंजस्य करार केला आहे. भारताने सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध सातत्याने ठाम आणि तडजोड न करणारी भूमिका कायम ठेवली आहे, ती पुढेही कायम राहील,” असं भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं आहे.
———————————————————————————————