आळंदी : प्रसारमाध्यम वृत्तेसेवा
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मवर्षानिमित्त आणि संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन वर्षाच्या पावन प्रसंगी आज पहाटे आळंदीत संतभेटीचा ऐतिहासिक सोहळा उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला. यावेळी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची भेट संजीवन समाधी मंदिरात पहाटे ५.३० वाजता संपन्न झाली. या विशेष क्षणासाठी दोन्ही देवस्थानांच्या विश्वस्त मंडळींनी उपस्थित राहून सोहळ्याला साक्षी दिली.
तब्बल १७ वर्षांनंतर या दोन संतांची पालखी एकत्र येऊन “याची देही, याची डोळा” हा भक्तीमय अनुभव भाविकांना घेता आला. पालखी सोहळा आणि संत भेटीच्या निमित्ताने पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने आळंदीला गर्दी केली होती. आळंदी नगरी भक्तिरसात न्हालेली दिसत होती.
संत तुकाराम महाराजांची पालखी आज पहाटे कारंजा मंडपात थांबली होती. दर्शन, अभंगगान आणि संतभेटीनंतर सकाळी ही पालखी देहूकडे मार्गस्थ झाली. वाटेत दुपारी चिखली येथील प्रसिद्ध टाळ मंदिरात पालखी विसावा घेणार आहे. या मंदिरात संत तुकाराम महाराजांच्या पावन पादुका पालखीमध्ये दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे या मंदिरात संत तुकाराम महाराजांचे दगडाचे टाळ आजही जतन करून ठेवले आहेत. “संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, पण त्यांनी आपले टाळ चिखली गावात ठेवले” अशी एक पौराणिक आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे आजच्या दिवशी या मंदिरातील भेट ही भक्तांसाठी एक अपूर्व अनुभूती ठरतेय.
संध्याकाळी पालखी देहुनगरीत पोहोचणार असून, पुढील प्रवास भक्तांच्या सहभागाने अधिकच भक्तिमय होणार आहे. आळंदी ते देहू अशी ही अध्यात्माची आणि श्रद्धेची जोड पुन्हा एकदा नव्या भक्तीमय पर्वाचा प्रारंभ करत आहे. भाविकांसाठी ही एक जीवनातील अविस्मरणीय अनुभूती ठरली असून, भक्तिरसात न्हालेल्या या सोहळ्याचे साक्षीदार होणं हे भाग्य समजले जात आहे.
————————————————————————————