हंगाम उशिरा सुरु झाला आणि लवकर संपला
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
यावर्षी हापूस आंबा कधी आला आणि कधी गेला हे समजलेच नाही. मुळातच यावर्षी आंब्याचा हंगाम उशिरा सुरु झाला आणि एक महिना आधी संपला . कडाक्याच्या उन्हाचा परिणाम सर्वच आंब्यांना बसला. मात्र विशिष्ट चव, स्वाद आणि रंग, आकार यामुळे कोकणातील हापूस जास्त लोकप्रिय आहे. या आंब्याची आवक घटल्याने हा आंबा बाजारात मोजकाच दिसत आहे.
पुणे, मुंबई, कोल्हापूरसह राज्यातील प्रमुख फळ बाजारात देवगड, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातून होणारी हापूसची आवक सध्या कमी झाली आहे. हापूस आंब्याचा हंगाम संपत आल्यामुळे कोल्हापूरच्या बाजारात गुजरात, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक येथून केशर, लंगडा, चौसा, दशहरी, नीलम, मलबारी, पायरी आणि तोतापुरी या जातींच्या आंब्यांची आवक वाढली आहे. या आंब्यांचे दर ₹२०० ते ₹५०० प्रतिडझन दरम्यान आहेत.
दरवर्षी प्रमाणे तीनवेळा येणारा विशेषतः कोकणच्या हापूस आंब्याचा मोहोर यावर्षी एकाही वेळी पूर्णपणे टिकला नाही. या आंब्याला प्रचंड वाढलेल्या उष्णतेचा फटका बसला. उष्णतेच्या सोबतीने यावर्षी हापूसवर किडीचाही प्रादुर्भाव झाला. याचा परिणाम म्हणून फक्त ५० टक्केच हापूसचे उत्पादन झाले.
यावर्षी हंगाम संपेपर्यंत कोकणच्या हापूसचे दर सर्वसामान्याच्या आवाक्यात आलेच नाहीत. यामुळे हापूसची चव सर्वसामान्याना चाखता आली नाही. हंगामाच्या सुरुवातीला कोकणच्या हापूसचे दर किमान १८०० रुपये डझन होते. हंगाम संपायच्यावेळीही कोकच्या हापूसचे दर किमान ८०० रुपये डझन होते.
यावर्षी हापूसचा हंगाम तुलनेने लवकर संपला. कारण शेवटच्या मोहोराला फार मोठा उन्हाचा तडाका बसला. यामुळे मोठ्या प्रमाणात मोहोर गळाला. झाडावर जो मोहोर शिल्लक होता तो पूर्णपणे टिकाऊ नव्हता. यामुळे जास्तीत जास्त फळे पूर्णपणे तयार होऊ शकली नाहीत. यावर्षी झाडांना पाणीही कमी पडले. हावामान बदलामुळे आंबा उत्पादक पुरता हवालदिल झाला आहे. यातच निर्यात केलेला कोकणचा हापूस अमेरिकेने नाकारला आहे. यामुळे निर्यातीचा खर्च आंबा उत्पादकाना सहन करावा लागणार आहे. हाच आंबा भारतीय बाजारपेठेत राहिला असता तर आंब्याचे दर आवाक्यात राहिले असते.