मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
आधुनिक जीवनशैलीत कामाचा ताण, डिजिटल स्क्रीनचा जास्त वापर आणि धकाधकीची दिनचर्या यामुळे झोपेची कमतरता ही जागतिक समस्या बनत चालली आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाइल-लॅपटॉपवर घालवलेला वेळ, सततचा मानसिक तणाव आणि स्पर्धात्मक वातावरणामुळे अनेकांना आठ तासांची गाढ झोप मिळणे कठीण होत आहे. आरोग्यतज्ज्ञ या स्थितीला ‘स्लीप एपिडेमिक’ असे संबोधत आहेत. यावर तोडगा म्हणून आता एक वेगळा ट्रेंड लोकप्रिय होत आहे – स्लीप टुरिझम.
स्लीप टुरिझम म्हणजे काय ?
स्लीप टुरिझम म्हणजे असा प्रवास, जिथे तुमचे मुख्य उद्दिष्ट फक्त चांगली झोप मिळवणे हेच असते. पूर्वी हॉटेल्समध्ये केवळ आरामदायी पलंगाची सुविधा असायची, पण आता संपूर्ण प्रवास झोप सुधारण्याच्या दृष्टीने डिझाइन केला जातो. काही रिसॉर्ट्समध्ये आठवडाभरासाठी खास खोल्या उपलब्ध करून दिल्या जातात. येथे झोपेसाठी आवश्यक अरोमा थेरपी, स्पा ट्रीटमेंट, ध्यान, योग निद्रा, साउंड हीलिंग आणि वैद्यकीय कार्यक्रमांचाही समावेश केला जातो.
पूर्वी लोक आरोग्यासाठी फक्त आहार आणि व्यायामाला महत्त्व देत होते; पण आता झोप ही तिसरी मोठी गरज म्हणून ओळखली जाते. LocalCircles ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारतात तब्बल ६१ टक्के लोक दररोज सहा तासांपेक्षा कमी झोप घेतात. सततच्या तणावातून बाहेर पडण्यासाठी, मन-शरीराशी पुन्हा जोडण्यासाठी आणि जीवनशैली सुधारण्यासाठी लोक स्लीप टुरिझमकडे आकर्षित होत आहेत.
भारतामध्ये स्लीप टुरिझमचे ठिकाणे
भारतामध्येही गाढ झोपेचा अनुभव देणारी अनेक रिसॉर्ट्स आणि वेलनेस सेंटर्स उपलब्ध आहेत
-
आनंदा इन द हिमालयाज, ऋषिकेश – योग निद्रा, शिरोधारा आणि मेडिटेशन थेरपीसाठी प्रसिद्ध.
-
आत्मंतन वेलनेस रिसॉर्ट, मुळशी (पुणे) – योग, स्पा ट्रीटमेंट आणि झोप सुधारण्यासाठी खास कार्यक्रम.
-
स्वास्वरा, गोकर्णा (कर्नाटक) – टेक-फ्री लाइफस्टाइल आणि ध्यानधारणा यावर भर.
-
वन, देहरादून – साउंड हीलिंग, आयुर्वेदिक ट्रीटमेंट आणि जंगलनुमा आर्किटेक्चरचा अनुभव.
गुड स्लीप टिप्स
आरामदायी झोपेसाठी केवळ टुरिझमच नाही, तर दैनंदिन सवयी बदलणेही महत्त्वाचे आहे.
-
रात्री झोपेच्या किमान एक तास आधी मोबाइल-लॅपटॉपपासून दूर रहा.
-
हलका आहार घ्या आणि ध्यान किंवा श्वसनक्रिया करा.
-
झोपण्याचे वेळापत्रक ठरवा आणि ते पाळा.