मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
मराठा आरक्षणाचा प्रश्नावर उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील ठामपणे बसलेले असतानाच आज दुपारी सरकारच्या मराठा आरक्षण उपसमितीची बैठक यशस्वीरित्या पार पडली.
बैठकीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची माहिती देत सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचं स्पष्ट केलं. ” सरकारने पाणी कापणे, वीज बंद करा असे कोणतेही आदेश दिलेले नाहीत. उलट मुख्यमंत्र्यांशी बोलून आंदोलकांची सोय केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात लवकरच मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा होईल. कुठेही आंदोलकांची कोंडी केली जात नाही. विरोधकांनी विनाकारण राजकारण करू नये,” असा टोला त्यांनी लगावला.
विखे पाटील पुढे म्हणाले, “मराठा आरक्षण समितीत सकारात्मक चर्चा झाली आहे. महायुती सरकारची एकच भूमिका आहे – आरक्षण द्यायचं आहे. प्रश्न सुटावा याकडे आमचं लक्ष आहे. न्या. शिंदे लवकरच जरांगे यांच्याकडे चर्चेसाठी जातील. आधी चर्चा होऊ द्या, मग आम्ही सविस्तर बोलू.”
नेमकं काय म्हणाले विखे पाटील ?
आज उपसमितीच्या बैठकीत आम्ही सर्वच सदस्य उपस्थित होतो. चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, उदय सामंत यांच्यासह सर्वच सदस्य या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली. अतिशय सकारात्मक भूमिका आमच्या सर्वांची आहे. या प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे, हीच सरकारची देखील भूमिका आहे, आणि म्हणून या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे साहेब, कोकणाचे विभागीय आयुक्त आणि आमच्या विभागाचे सचिव त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी जाणार आहेत, आणि चर्चा झाल्यानंतर आणखी काही मुद्दे उपस्थित झाल्यास त्यावर पुन्हा चर्चा करू असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर तीव्र टीका केली. “मराठ्यांचा संयम बघू नका. मुख्यमंत्र्यांनी वेठीस धरू नये, ही संधी सोन्यात बदलावी. मराठ्यांचा संयम सुटला, तर तो दिवस तुमच्यासाठी वाईट ठरेल. तुम्ही अडचणीत याल, मोदी-शाह सुद्धा अडचणीत येतील,” असा इशारा त्यांनी दिला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधत जरांगे म्हणाले, “महाराष्ट्र अस्थिर करायचं, पोलिसांना लाठीचार्ज करायला लावायचं, वातावरण दुषित करायचं हे फडणवीसांचे काम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरक्षण द्यायचं नाही, तर फक्त राजकारण करायचं आहे. पण आम्हाला राजकारण नको, आम्हाला फक्त हक्काचं आरक्षण हवं आहे.”
तसंच आंदोलकांना संयम राखण्याचं आवाहन करत ते म्हणाले, “आपली वाहनं पोलिसांनी सांगितलेल्या ठिकाणी उभी करा. शांत राहा. सगळी मुंबई आज मराठा झाली आहे. आपण वाट पाहू. आम्ही हक्काचं आरक्षण मागतोय.”
उपोषण, सरकारची सकारात्मक भूमिका आणि लवकरच होणारी चर्चा या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटतो का, की जरांगे आपली ठाम भूमिका कायम ठेवतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
————————————————————————————————