कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
आपल्या घरातील एसीचे तापमान किती ठेवायचे, हे आता सरकार ठरवणार आहे. भारत सरकार आता घर, कार आणि ऑफिसमध्ये लागलेल्या एसीच्या कमाल आणि किमान तापमानाचे नियंत्रण करण्यासाठीची योजना आखत आहे. वीजेचा अनावश्यक वापर कमी करण्यासाठी सरकार हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे, असे केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर म्हणाले. तर त्यांनी ३० जीडब्लूएच बॅटरी स्टोरेज प्रकल्पांसाठी ५ हजार ४०० कोटी रुपयांच्या व्हेबिलिटी गॅप फंड (व्हीजीएफ) सहाय्याची घोषणाही केली आहे.
खट्टर म्हणाले की, देशातील सर्व नवीन एअर कंडिशनरसाठी किमान तापमान २० अंश सेंटीग्रेड आणि कमाल २८ अंश सेंटीग्रेड निश्चित करण्यासाठी विचारविनिमय केला जात आहे. देशात १० कोटी एअर कंडिशनर (एसी) आहेत आणि दरवर्षी सुमारे १.५ कोटी नवीन एसी जोडले जातात. एसी तापमानात एक अंश घट झाल्याने ऊर्जेचा वापर ६ टक्केने वाढतो.
खट्टर यांनी अशी स्पष्ट सांगितले की, नवीन एअर कंडिशनर ज्यांच्याकडे असणार त्यांना आता तापमान २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी आणि २८ अंशांपेक्षा जास्त ठेवण्याची परवानगी नसेल. खट्टर यांनी पुढे नमूद केले की, केंद्र सध्या व्हायबिलिटी गॅप फंडिंग (व्हीजीएफ) द्वारे १३.२ जीडब्लूएच बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टमला प्रोत्साहन देत आहे. याव्यतिरिक्त देशाची बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टमची आवश्यकता पूर्ण करून ३३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचा तसेच ५ हजार ४०० कोटी रुपयांच्या नवीन योजनेचे उद्दिष्ट २०२८ पर्यंत साधण्याचा मानस आहे. तर मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कामगिरीवर प्रकाश टाकत खट्टर म्हणाले की, भारत अतिरिक्त ऊर्जेचा स्त्रोत होण्याच्या मार्गावर आहे.