spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeराजकीयमहायुतीत महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला

महायुतीत महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला

नाराजी दूर करण्यासाठी अध्यक्षपदांचा पर्याय,

विरोधकांना प्रत्युत्तराचीही रणनीती तयार

मुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्यात महायुती सरकार मधून सत्तावाटपा संदर्भात एक मोठी आणि निर्णायक घडामोड समोर आली आहे. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरला असून, मंत्रीपद न मिळालेल्या नाराज आमदारांना महामंडळ अध्यक्षपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

महायुतीच्या समन्वय समिती मध्ये महामंडळ वाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, यामध्ये अ, ब, क अशी महामंडळांची वर्गवारी करण्यात आली आहे. सर्वाधिक आमदार असलेल्या भाजपच्या वाट्याला ४८ टक्के महामंडळे, शिवसेनेला २९ टक्के तर राष्ट्रवादीला २३ टक्के महामंडळे मिळणार आहेत. राज्यात सध्या १३८ महामंडळांमध्ये ७८५ सदस्य आहेत.

मंत्रीपद मिळाले नाही अशा नाराज आमदारांची नाराजी दूर करून आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पक्षांतर्गत असंतोष कमी करण्याचा प्रयत्न महायुतीकडून सुरू आहे. यामुळे नाराज आमदारांमध्ये महामंडळ अध्यक्षपदासाठी लॉबिंग सुरू झाल्याचेही समजते. राजकीय विश्लेषकांच्या मते, महामंडळांवरील नियुक्त्या हा सत्तावाटपाचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून, यामुळे पक्षातील निष्ठावान कार्यकर्ते व आमदारांना योग्य स्थान मिळते, संघटनात्मक बांधणी मजबूत होते आणि आगामी निवडणुकांत महायुतीला फायदा होऊ शकतो.

दरम्यान, शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांच्या शासकीय निवासस्थानी बुधवारी महायुती समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रविंद्र चव्हाण, शंभुराज देसाई, उदय सामंत, सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ हे उपस्थित होते. बैठकीत ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याविषयी विशेष चर्चा झाली. या मेळाव्याला उत्तर देण्यासाठी आणि विरोधकांच्या प्रचाराचा पोलखोल करण्यासाठी महायुतीकडून ठोस रणनीती आखण्यात आल्याचे समजते.

तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात महायुतीच्या आमदार व मंत्र्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. ‘महायुतीत वाद होतील, अशी कोणतीही वक्तव्ये टाळा’, अशी सक्त ताकीद फडणवीसांनी दिली आहे. पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या हाती कोलीत जाऊ नये, यासाठी वादग्रस्त किंवा भडक वक्तव्ये टाळावीत, असे आवाहन त्यांनी केल्याचे सूत्रांकडून समजते.

एकूणच, महामंडळ वाटप, नाराज आमदारांची समजूत आणि विरोधकांचा प्रचार निष्फळ करण्यासाठी महायुतीकडून व्यूहात्मक पावले उचलली जात असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे सगळे निर्णय अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

————————————————————————————-

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments