Mangaon Gram Panchayat in Kolhapur district has announced an innovative scheme named “Our Parents, Our Responsibility”.
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव ग्रामपंचायतीने संपूर्ण राज्यात नवा आदर्श निर्माण केला आहे. “आमचे आई-वडील आमची जबाबदारी” या नावाने एक नावीन्यपूर्ण योजना जाहीर करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत गावातील ६५ वर्षांवरील निराधार ज्येष्ठ नागरिकांना ब्लड प्रेशर आणि शुगरची औषधे प्रतिमाहिना आयुष्यभर मोफत देण्यात येणार आहेत.
ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सरपंच डॉ. राजू मगदूम यांनी ग्रामसभेत दिली. योजनेचा पूर्ण खर्च ग्रामनिधीतून करण्यात येणार असून, सर्व पात्र नागरिकांचे सर्वेक्षण करून त्यांना लाभ दिला जाणार आहे.
माणगाव ग्रामपंचायतीने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेमुळे गावातील सुमारे १०० ते १२५ ज्येष्ठ नागरिकांना औषधोपचाराची मदत मिळणार आहे. देशात अशा स्वरूपाची योजना राबवणारी माणगाव ही पहिली ग्रामपंचायत ठरली असून, या उपक्रमामुळे गावातील जेष्ठांच्या आरोग्याला मोठा हातभार लागेल असा विश्वास सरपंच डॉ. राजू मगदूम यांनी व्यक्त केला आहे.
या योजनेची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू असून, जिल्ह्यात पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवले गेले असले तरी, माणगाव ग्रामपंचायतीने जाहीर केलेला हा आरोग्यविषयक उपक्रम विशेष ठरला आहे. काही ठिकाणी पर्यावरणाचा संदेश देणारे उपक्रम राबवले गेले असले तरी, जेष्ठ नागरिकांसाठी औषधोपचाराची जबाबदारी स्वीकारणारी ही योजना सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. माणगाव ग्रामपंचायतीचा हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.