spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeपर्यटनविकासाच्या वाटेवरचं सर्वांत पहिलं डेस्टिनेशन...पर्यटन

विकासाच्या वाटेवरचं सर्वांत पहिलं डेस्टिनेशन…पर्यटन

गोवा, केरळ आदी राज्ये या मानसिकतेमुळेच आज पर्यटनात अग्रेसर आहेत. पर्यटनात आपण ज्या स्थळांची नावे घेतो तेथील लोकही आपला आदर्श डोळ्यांसमोर ठेवतील. अग्रेसर पर्यटनस्थळांच्या यादीत आपल्या गावाचे नाव असेल. मूलभूत विकासासाठी आणि विकासाच्या साधनासाठी गरज आहे, ती एका ग्लोबल संवादाची. पर्यटन वाढले तरच संवाद वाढेल आणि संवाद वाढला तरच पर्यटन वाढेल. विकासाच्या वाटेवरचं सर्वांत पहिलं डेस्टिनेशन पर्यटनाचंच आहे, हे आता लक्षात घ्यायला हवं. फक्त गरज आहे ती आपल्या सर्वांच्या इच्छाशक्तीची.

मनुष्यप्राणी सुरवातीपासूनच नदीच्या काठावर वस्ती करायचा. याच वस्तीच्या वसाहती निर्माण झाल्या आणि त्या नदीच्या खोऱ्यात अगदी नैसर्गिकपणे नवनव्या संस्कृतींनी जन्म घेत समाजजीवनाला प्रवाहित केले.  आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांनी नावलौकिक मिळवत मानवी जीवन परिपूर्ण आणि समृद्ध बनविले. आनंद आणि समाधान या दोन शब्दांत या संस्कृतीची परिपूर्णता होती. कारण आनंद आणि समाधान मिळण्यासाठीची सर्व कारणे या संस्कृतीत उपलब्ध होती. मानवी विकासासोबत निर्माण होत होत्या रुढी-परंपरा, व्रत-वैकल्ये, सण-समारंभ, श्रद्धास्थाने, लोककला, खाद्यसंस्कृती आणि यासाठी निर्माण  झालेली वास्तू शिल्पे मंदिरे गडकोट या सर्वांमधून संस्कृती ठळक होत होती.  या सर्वच गोष्टी इथल्या लोकजीवनाचे अविभाज्य अंग होत्या.  त्यामुळे या संस्कृतिक अंगाचे किंवा साधनांचे संगोपन आणि संवर्धन ही नागरिकांची  जबाबदारीच नाही तर कर्तव्य होते.  त्यामुळे यात्रा उत्सव, प्रदक्षिणा, वारी, खेळ, बाजारपेठ यांना अनन्यसाधारण महत्त्व होते. गाव, पंचक्रोशी,  विभाग अशा अनेक स्तरांवर हे उपक्रम आयोजित केले जायचे.  उत्सवासोबत  वस्तुविनिमय, बाजारपेठ, कृषी केंद्र, उद्योग केंद्र, वधू-वर निवड, जनावरांचा बाजार अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आपसूक घडू लागल्या. त्यामुळे इथली यात्रा, मंदिरे, वास्तुशिल्प, गड-कोट, लोककला हे सर्व लोकांच्या दैनंदिन जगरहाटीचा अविभाज्य घटक बनले आणि हे सण, उत्सव, परंपरा मानवी आर्थिक आणि सामाजिक विकासाची साधने बनली.  त्यामुळे जगाशी संवाद आणि व्यापारासोबतच या सर्व साधनांचे आपोआपच संगोपन आणि संवर्धन व्हायचे. या निमित्ताने लोक प्रवास करीत एकमेकांच्या गावाला जाणे, उत्सवात सहभागी होणे, एकमेकांच्या प्रथा, परंपरा जाणून घेणे, खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेणे, नवनव्या गोष्टी शिकणे हे सर्व घडत होते. आपल्याव्यतिरिक्त जगातील आपल्याभोवतालचा इतिहास, भौगोलिक रचना, हवामान, प्राणिसृष्टी, निसर्ग, संस्कृती, लोककला, लोकजीवन, भाषा, आहार या आणि अनेक गोष्टी ज्ञान, व्यक्तिमत्त्व विकास, राष्ट्रीय एकात्मता यासाठी उपयुक्त ठरतात. यालाच आपण पर्यटन असे नाव दिले आहे.

कालांतराने विकासाच्या प्रवासात या प्रवाहाचा केंद्रबिंदू सरकला. ज्या ठिकाणी दळणवळणाच्या सुविधा तसेच रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत गेल्या अशा ठिकाणी वसाहती वाढू लागल्या. छोट्या गावांची निमशहरे, शहरे आणि शहरांची महानगरे बनलेली लक्षातही आले नाही. या विकासाच्या प्रवाहात माणूस आत्मकेंद्रित बनला आणि आपल्या पारंपरिक लोकजीवनापासून खूप दूर निघून आला. साहजिकच त्याची जीवनशैली बदलली. या नव्या जीवनशैलीत पारंपरिक गोष्टींना फारसे स्थान नव्हते आणि ते देण्याएवढा त्यांच्या धकाधकीच्या जीवनात वेळही नव्हता. साहजिकच निखळ आनंद, मनःशांती आणि जीवनातील थोड्या बदलासाठी तो नवी साधने शोधू लागला. यामध्ये ध्यानधारणा आणि सहल हे दोन पर्याय त्याने निवडले. त्यापैकी पर्यटन हा उत्तम पर्याय ठरला. तो रोज नवनवीन पर्यटन स्थळे शोधू लागला आणि पुन्हा एकदा जुन्याच गोष्टीत तो नवे काही करण्याचा आणि शोधण्याचा प्रयत्न करू लागला.

कोल्हापूर जिल्ह्याचा  विचार केला तर विपुल खनिज संपदा, एकाच तालुक्यात अतिवृष्टी आणि अल्पवृष्टी असणारा प्रदेश, सुपीक जमीन, विभिन्न पिके, जैवविविधता, सुंदर निसर्ग,  सर्वोत्कृष्ठ  स्थापत्य कलेचा नमुना असणाऱ्या असंख्य वास्तू, मनाला भुरळ पाडणारी आणि वारंवार भेट द्यावी अशी वाटणारी  पर्यटनस्थळे, शेकडो वर्षांचा इतिहास सांगणारे आणि स्वराज्याचा इतिहास जिवंत ठेवणारे किल्ले, ऐतिहासिक ठिकाणे,  अध्यात्मिक आणि पौराणिक दाखले देणारी आणि  दक्षिण काशी म्हणून विशेष ओळख असणारी देव देवतांची भूमी,  अशा वैविध्यपूर्ण आणि विविधतेने परिपूर्णतमुळे महाराष्ट्रातील पर्यटन विकासाला सर्वांत जास्त पोषक वातावरण असणारा कोकण आणि घाटमाथ्याची एकात्मिक अद्भुत अनुभूती देणारा हा विभाग आहे. तीन राज्यांच्या सीमारेषेवर असणारा हा प्रदेश राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते आणि जवळच असणाऱ्या जल आणि हवाई वाहतुकीच्या सुविधेमुळे दळणवळणास सुलभआहे. वाहणाऱ्या प्रत्येक नदीच्या  खोऱ्यातील वैशिष्ट्यपूर्ण लोकजीवन, लोककला, भाषा आणि तांदूळ, नाचणी, आंबे, फणस, रताळी, बटाटे, मसाल्याचे पदार्थ, कडधान्य, वनौषधी, रानमेवा या आणि अशा अनेक अन्नधान्यांची विपुलता आणि त्यातून निर्माण झालेली खाद्यसंस्कृती हे पर्यटकांसाठी विशेष आकर्षित करणारे घटक आहेत.

गोवा, कोकण आणि दक्षिण भारतात   जाणारे बहुतेक लोक कोल्हापूर जिल्ह्यातील विविध रस्ते  आणि घाट मार्गाचा अवलंब करतात. या प्रत्येक मार्गावर ४०-५० किलोमीटर आजूबाजूला अतिशय सुंदर पर्यटनस्थळे आहेत . परंतु येथील स्थानिक लोकांनादेखील या स्थळांची समाधानकारक माहिती देता येणार नाही. या ठिकाणी जागोजागी पर्यटन स्थळाची आणि अंतराची माहिती सांगणारे दिशादर्शक फलक लावले असले तरी पर्यटकांच्या मनात कुतूहल निर्माण होईल. कारण पर्यटक नवनवीन जागांच्या शोधात असतो. आपण त्याच्यासमोर पर्याय म्हणून उभे राहिले  पाहिजे. चहा घेण्यासाठी आणि इंधन भरण्यासाठीही न थांबणारे पर्यटक जर थांबले तरच संवाद घडेल. तो घडला तर त्यांना इथली माहिती मिळेल आणि त्यांच्या आवडीच्या यादीत कदाचित आपला समावेश होईल. थांबले तर चहा घेतील. जेवण करतील. स्थानिक वस्तूंची चौकशी करून खरेदी करतील. बचत गट, शेतकरी मंडळ, स्थानिक व्यापारी, फिरस्ते यांची विक्री होईल. त्यांना पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आणि इथे राहण्यासाठी नियोजन करता येईल. इथल्या कला आणि क्रीडा प्रकाराचा, खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेता येईल. स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळेल. हॉटेलच्या खोल्यांना मागणी वाढेल. थांबलेले पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संवाद घडेल. जो एकाला सांस्कृतिक आणि दुसऱ्याला आर्थिकदृष्ट्या समृद्ध बनवेल.

निव्वळ फलक लावून हे होणार नाही, तर स्थानिक लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ पारगड परिसरातील नागरिकांना पारगडविषयी माहिती असणे आवश्यक आहे. त्याचा इतिहास-भूगोल, वास्तू, जैवविविधता, कालानुरूप झालेले बदल, संस्कृती, खाद्यसंस्कृती, लोककथा, आख्यायिका, समज-गैरसमज या सर्वच बाबींचा समावेश आहे. ही माहिती जर आपण देऊ शकलो तर त्या स्थानाविषयी पर्यटकांची रुची वाढेल. ही माहिती पारंपरिक पद्धतीने किंवा इतर साधनांचा वापर करून मिळविता येईल. यासाठी स्थानिक नागरिक हॉटेल व्यावसायिक, स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये, व्यापारी संस्था, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्रितपणे पुढाकार घेणे गरजेचे आहे.

पर्यटनवाढीतील प्रमुख घटक असणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांनी या क्षेत्राकडे अधिक गांभीयनि पाहावे लागेल. असे झाले तरच ‘दररोज किती ताटे जातात आणि किती रुम फुल्ल होतात’, या पलीकडे पर्यटनाच्या विकासाचा विचार होईल. स्थानिक पातळीवरील उपलब्ध साधनांचा वापर करून रोजगार निर्माण करता येतो. याची जाणीव स्थानिक नागरिकांना करून देणे, त्यांना योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. स्थानिक पर्यटनाला चालना द्यायची असेल तर एका व्यापक जनजागृतीची गरज आहे. पर्यटन हे आपल्या लोकसंस्कृतीपासून वेगळे नाही, ही जाणीव करून द्यावी लागेल.

पूर्वी पंचक्रोशी किंवा तालुक्यातल्या सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक उत्सव कार्यक्रमाला हजेरी लावणे, नगरप्रदक्षिणा, वारी, स्थानिक सहली, वनभोजन हा देखील स्थानिक पर्यटनाचा भाग होता. वार्षिक उत्सवामुळे पुरातन मंदिरे, ऐतिहासिक ठिकाणे यांची डागडुजी, संवर्धन आणि संगोपन आपोआप व्हायचे. वाढते शहरीकरण आणि बदलत्या जीवनशैलीत या सर्व गोष्टी हळूहळू विस्मरणात किंवा दैनंदिन स्मरणातून बाजूला गेल्या. याची जाणीव नव्या पिढीला करून द्यावी लागेल. पर्यटनासाठी उपलब्ध असणारी साधने म्हणजे निसर्गस्थळे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तू, गडकोट, खाद्यसंस्कृती, स्मारके अशा अनेक साधनांचे संवर्धन, संगोपन, अभ्यास नव्याने नव्या साधनांसह करावा लागेल, निसर्ग, मंदिरे, गड-कोट आणि वास्तूंचं नाही, तर मानवी जीवन

आणि संस्कृतीमधील प्रत्येक घटक हा पर्यटनाचे साधन आहे. कोल्हापूरची कुस्ती पाहायला, शिकायला देश विदेशातून लोक यायचे. खेळाचे प्रकार, नाटक, सिनेमा, दशावतार, खेळिये, लावणी आणि असे लोककला प्रकार, हुरडा पार्टी, गुऱ्हाळघरे, मालवणी थाळी, कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ, उसळपाव, दूध सार अशी गावोगावची खाद्यसंस्कृती, गोवा आणि कोकणातील शिमगोत्सव, नवरात्रोत्सव, आंगणेवाडीची यात्रा, जोतिबा, काळभैरव, खंडोबा, काळूबाई यात्रा अशा देवदेवतांच्या यात्रा, जत्रा, माही, नगरप्रदक्षिणा, वारी ही सर्वच पर्यटनाची साधने आहेत. यामध्ये अलीकडेच सुरू झालेले अम्युजमेंट पार्क आणि हरवत चाललेल्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारी कृषी पर्यटन केंद्रे याची भर पडत आहे.

पर्यटन हा रोजगार निर्मितीसाठी एक प्रमुख पर्याय म्हणून समोर आला आहे. उपलब्ध साधनांना सेवेची आणि आपुलकीची जोड दिली तर एक प्रत्येक बेरोजगार तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. पर्यटनस्थळाविषयी आस्था वाढली तर पर्यटनस्थळांवर होणारे अनैतिक चाळे आणि हुल्लडबाजी आपोआप थांबेल. अशा गोष्टींना स्थानिक लोक अटकाव करतील. कारण ती ठिकाणे त्यांच्या अस्मिता असतील आणि त्यांच्या रोजगाराचा घटक असेल. अशा वेळी भेट देणारे पर्यटकदेखील गैरवर्तन करण्याचे धाडस करणार नाहीत. स्थानिक पर्यटन वाढले तरच आंतरराज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन वाढू शकेल. शाहूवाडी तालुक्यातील नागरिकास पारगड माहीत असला पाहिजे, तो तिथे गेला पाहिजे तसेच चंदगडचा माणूसदेखील बाहुबली आणि विशाळगड फिरून आला पाहिजे, ही स्थानिक पर्यटनाची संकल्पना आहे. यादृष्टीने विचार झाला तर स्थानिक पर्यटनाला ग्लोबल टच मिळाल्याशिवाय राहणार नाही.

जगभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या देशांनी सर्व ऐतिहासिक आणि दुर्मिळ साधनांचे जीवापाड जतन केले आहे आज आपण ते पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी जातो ज्याला आपण देशाटन म्हणतो त्याची विजय दोन्ही बाजूला स्थानिक पर्यटनाच्या विकासात लपलेली आहेत परदेशी लोकांनी ती वेळीच ओळखली पर्यटनाची बीजे खरं तर आपल्या संस्कृतीच लपली आहेत याचे महत्त्व आपल्या पूर्वजांनी आधीच ओळखले होते फक्त गरज आहे ती बीजे ओळखण्याची आठवण साठवण्याची आणि नव्याने पुनर्जीवित  करण्याची

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments