कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
इंदूर हे देशातील पहिले भिकारीमुक्त शहर ठरले आहे. वर्षभरापूर्वी प्रशासनाने मोहीम हाती घेण्यापूर्वी शहरातील रस्त्यांवर सुमारे पाच हजार भिकारी होते. जिल्हाधिकारी आशीष सिंह यांनी याबाबत माहिती दिली.
भिकाऱ्यांना रोजगार देऊन पुनर्वसन
इंदूर शहराला भिकारीमुक्त करण्यासाठी येथे विविध उपक्रम, प्रोत्साहनपर बक्षीस योजना राबवण्यात आल्या. शहरातील भिकाऱ्यांना रोजगार देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले, तर भीक मागणाऱ्या मुलांना शाळेत दाखल करण्यात आले. ‘भिकारी निर्मूलनासाठी आम्ही सुरू केलेली मोहीम एक आदर्श पद्धत बनली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय आणि जागतिक बँकेच्या पथकानेही याला मान्यता दिली आहे’, असे सिंह यांनी सांगितले.
फेब्रुवारी २०२४ पासून भीक मागण्याविरोधात मोहीम
केंद्रीय मंत्रालयाने भिक्षेकरी निर्मूलनाचा पथदर्शी प्रकल्प सुरू केलेल्या १० शहरांपैकी इंदूर एक आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये भीक मागण्याविरोधात मोहीम सुरू करण्यात आली होती. शहरात ५०० मुलांसह सुमारे पाच हजार भिकारी होते. पहिल्या टप्प्यात आम्ही जनजागृती मोहीम राबवली. त्यानंतर भिकाऱ्यांचे पुनर्वसन करण्यात आले. राजस्थानहून इंदूरला भीक मागण्यासाठी येणारे अनेक भिकारीही आम्हाला सापडले,’ असे महिला आणि बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी रामनिवास बुधोलिया यांनी सांगितले.



