अनिल जासुद : कुरुंदवाड
महाराष्ट्रासह कर्नाटकमधील असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात या मोसमातला पहिला चढता दक्षिणद्वार सोहळा आज बुधवारी एक वाजता पार पडला. यावेळी हजारो श्री दत्त भाविक भक्तांनी दत्त नामाचा गजर करीत दक्षिणद्वार सोहळ्यात पुण्यस्नान पर्वणीचा लाभ घेतला.
रविवारी ओसरलेल्या कृष्णेच्या पाणी पातळीत मंगळवारी सांयकाळी पुन्हा वाढ झाली. बुधवारी सकाळी अकरा नंतर कृष्णेचे पाणी श्री दत्त मंदिराच्या गाभार्यात शिरले. यामुळे येथील पुजारी मंडळीनी गर्भगृहाची तीनही द्वारे उघडून श्रीं ना, पंचधातुच्या पादुका, फोटो, मुखवटे व इतर चल उपकरणांसह वरच्या बाजूस असलेल्या श्रीमन्न नारायणस्वांमीच्या जेथे एरवी श्रींची पालखीतील उत्सवमुर्ती असते तेथील मंदिरात आणून पुढचे सर्व पुजोपचार सुरु ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान, गेल्याच आठवठ्यात म्हणजे १७ व २२ जूनला कृष्णेचे पाणी मंदिराच्या गाभार्यापर्यंत येऊन परत फिरले होते. यामुळे अपेक्षित असलेल्या दक्षिणद्वार सोहळ्याने हुलकावणी दिली होती. आज बुधवारी दक्षिणद्वार सोहळा होऊ शकतो याची सोशल मिडीया, मोबाईलवरुन माहिती मिळाल्याने हजारो भाविक नृसिंहवाडीत आले होते.
आज बुधवारी दुपारी एक वाजता कृष्णामाईने श्री दत्तप्रभूंच्या चरणावर आपल्या संथ वाहणार्या धारेने अभिषेक घालून दक्षिणद्वार सोहळा पूर्ण केला. या पवित्र सोहळ्यात महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात आदी राज्यातील हजारो श्री दत्त भाविक भक्तानी स्नान करुन पवित्र पुण्यस्नान पर्वणीचा लाभ घेतला.
दक्षिणद्वार सोहळ्यानिमित्त होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन श्री दत्त देवस्थान समितीने सुरक्षेच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना सज्ज ठेवल्या होत्या. यामुळे या मोसमातला पहिला चढता दक्षिणद्वार सोहळा हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत अतिशय भक्तीमय वातावरणात श्री दत्त नामाचा गजर करीत पार पडला.
——————————————————————————————