पंचमस्थानाचा अभ्यास करत असताना आपण पहिले की, पंचमस्थान हे प्रेम व संततीचे स्थान आहे. पण आज आपण पंचमस्थानास प्रेम, संतती, बरोबर विद्या व बुद्धीचे स्थान म्हणून मानले जाते हे ही जाणून घेणार आहोत. नवग्रहामध्ये संतती व विद्या या दोन्हीचा कारक गुरु मानला जातो व बुद्धीचा कारक ग्रह बुध मानला जातो. बुद्धीचा कारक ग्रह बुध आहे, म्हणून कुंडली मध्ये बुधाची स्थिती जास्त लक्षात घेतली पाहिजे. परंतु, खऱ्या अर्थाने पंचम स्थानाचा कारक ग्रह गुरुच समजावा. बुद्धीकारक बुध हा वायू किंवा पृथ्वी राशीत असेल तर बुद्धी उत्तम असते. म्हणजे हा बुध वृषभ, मिथुन, कन्या, मकर व कुंभ राशीचा असावा.
गुरु, बुध, शनी हे ग्रह बलवान राशीला म्हणजे, गुरु, सिंह, धनु, कर्क राशीमध्ये असावा. शनी, तुला, मकर, कुंभ राशीमध्ये असावा. हर्षल – मीन, कुंभ राशी मध्ये. नेपच्यून – मिथुन, सिंह, कर्क, धनु राशी मध्ये असावा. बुध हा ग्रह सिंह राशी मध्ये किंवा कन्या व मिथुन राशी मध्ये रवि बरोबर असेल किंवा मिथुन कन्या राशी मध्ये राहू बरोबर असेल. बुद्धी अतिशय कुशाग्र असते व स्मरणशक्ती चांगली व आकलन शक्ति कोणत्याही विषयामध्ये चांगली असते.
पंचमेश म्हणजे पंचमस्थानाचे स्वामी रवी, बुध, गुरु, शुक्र असतील व ते ग्रह स्वगृही किंवा मित्र गृही असतील व ३, ४, ५, ९, १२ या स्थानी किंवा पंचामेशा वर बुध, मंगळ, गुरु, शुक्र, हर्षल यांचे शुभ योग होत असतील तर असे लोक बुद्धिमान असतात. पंचमस्थानाचा स्वामी शनी मंगळाच्या म्हणजे १०, ११, १, ८ राशीला असेल व तो पाप स्थानामध्ये ६, ८, १२ स्थानी असेल व गुरु बल हीन किंवा बुध बलहीन असेल तर शिक्षण पूर्ण होत नाही.
कुंडलीमध्ये पंचमस्थानी मंगळ, शनी, राहू, केतू अगर वक्री नेपच्यून असेल तर शिक्षण पूर्ण होत नाही. पंचम स्थानी बलहीन चंद्र, रवी असलेले मुले, मुली अभ्यासामध्ये हुशार होत नसतात. पंचमस्थाना मधील रवी, मेष, सिंह, धनु या अग्नी राशी मध्ये नसेल तर बुद्धी मंद ठेवील. परंतु, चंद्र पंचम स्थानामध्ये असेल तर हे लोक आपल्या संसारामध्ये छान गर्क असतात.
गुरु हा ग्रह विद्येचाच कारक आहे व तो पंचम स्थानाचाही कारक ग्रह आहे. व तो जर पंचमस्थानी असेल तर हे लोक अतिशय बुद्धिमान असतात. ते शिक्षणामध्ये शिष्यवृत्ती, पारितोषिक मिळवू शकतील. परंतु, गुरुचे हे परिणाम अग्नी व जल राशीमध्ये म्हणजे १, ४, ५, ८, ९, १२ या राशीमध्ये दिसून येतील. इतर राशी मध्ये गुरु असेल तर अशा मुली मुलांची बुद्धी असूनही शिक्षणामध्ये अडचणी येतील. परीक्षा पास होणार नाहीत किंवा परीक्षा देता येणार नाही, किंवा कौटुंबिक परिस्थितीमुळे शिक्षण मिळणार नाही.
शुक्र पंचमा मध्ये असेल तर शिक्षणापेक्षा गायन, शिवण, कशिदा, चित्रकला, यांची आवड निर्माण करते. पंचम स्थानी राहू चित्रकला, फोटोग्राफी यांची आवड उत्पन्न करतो. पंचमस्थानी मेष, सिंह, धनु, कर्क, वृश्चिक, मीन राशीचा शनी शिक्षण पूर्ण होऊ देत नाही. मिथुन, कन्या, तुला, वृषभ, मकर, कुंभ, राशीचा शनी बुद्धी उत्तम देतो, पण शास्त्रीय विषयांची आवड देतो, व येथील शनी स्त्रियांच्या कुंडली मध्ये असेल तर अशास्त्रिया संसारा मधील कामामध्ये अतिशयदक्ष असतात, कष्टाळू असतात.
पंचम स्थानी केतु शिक्षणाच्या बाबतीत तसे अपयशच देतो. येथे हर्शल असेल तर, विलक्षण बुद्धी व प्रतिभा निर्माण करील. येथील नेपच्यूनची फळे गुरुप्रमाणे समजावीत.
मंगळ बुधाची युती पंचमस्थानी किंवा १, ३, ५, ९ ह्या स्थानी ही युती असेल तर खेळांची आवड असेल. शारिरीक व्यायाम घेतला जातो व शरीर बांधेसूद असेल. मंगळ बुधाची युती कुंडलीमध्ये कोणत्याही स्थानामध्ये असेल तर गणितशास्त्राची आवड असेल व त्यामध्ये लवकर प्रगती होईल.
पंचमस्थानी एक शुभ व एक अशुभ ग्रहाची युती असेल तर शिक्षणामध्ये अडचणी येतील, अपयश येईल, शिक्षण पूर्ण होणार नाही. बुधाच्या मानाने यश मिळणार नाही.
गुरु व बुध बलवान नसतील व पंचमस्थानी शुभ अशुभ ग्रह एकत्र असतील तर उत्तम बुद्धी असूनही शिक्षणामध्ये मिळावे तसे यश मिळणार नाही. शिक्षण सोडावे लागेल शिक्षण पूर्ण होण्यापूर्वी विवाह होईल व विवाहाचा अडथळा शिक्षणामध्ये येईल. विद्या स्थानाचा नाश करणारे ग्रह शुक्र, मंगळ युती पाप ग्रह युक्त शुक्र, राहू, शनी, केतु हे समजावेत. पंचम स्थानातील शुक्र मंगळ युती शिक्षण सोडून नटण्या मुरडण्याकडे जास्त लक्ष देते, व हे प्रेमविवाह करतील.
रवी, चंद्र हे ग्रह विद्या साधारण देतात. बुध, गुरु बलवान, शनी ३, ५, ६ राशीचा, राहू हर्शल व नेपच्यून हे ग्रह शिक्षणामध्ये यश देतात.
- पंचमेश रवी शिक्षण साधारण.
- पंचमेश चंद्र, तो ही कर्क राशीचा असेल तर शिक्षणापेक्षा संसारामध्ये जास्त लक्ष. प्रेमळ ऐषोराम व उपभोगाकडे जास्त लक्ष. संतती बाबत खूप खस्ता खाव्या लागतात. व संततीची खूप काळजी घ्यावी लागते.
- पंचमेश मंगळ असेल तर खेळण्याकडे प्रवृत्ती, स्वभाव उतावळा असतो.
- पंचमेश बुध असेल तर मिथुन कन्या राशीची कुशाग्र बुद्धी, स्मरणशक्ती चांगली शृंगारीक नाटके व कादंबऱ्या वाचण्याची आवड.
- पंचमेश गुरु असेल तर संतती अल्प परंतु बुद्धीमानी होईल. बुद्धिमत्ता उत्तम, विद्ये मध्ये यश येईल. समाजप्रिय, आयुष्यात ऐहिक सुख उत्तम मिळेल. संसार सुखाचा होईल. पंचमेश गुरु असता भोग तृष्णा मर्यादित असते, व त्यामध्ये अनैसर्गिक व अनीतिमान मार्गाचे अवलंबन नसते. त्यामुळे ज्या स्त्रियांच्या पंचमस्थानी धनु, कर्क,किंवा मीन राशी असते, त्या स्त्रिया संसारामध्ये सर्व बाजूंनी सुखी असतात. पती प्रेमळ असतो. मुले बुद्धिमान व भाग्यशाली जन्मतात.
- पंचमेश शुक्र, शुभ ग्रह दृष्टी मध्ये असेल व वृषभ, तुला राशीमध्ये असेल तर शिक्षण पूर्ण होईल परंतु, पंचमेश शुक्र राहणी उच्च चैनीचा व खर्चाचा असतो.
- पंचमेश शनी असेल तर शिक्षणामध्ये अपयश येते. संतती संबंधी काळजी असेल. तसा विवाह लवकर ही जमत नाही. मनोभावना दुखावल्या सारख्या होतात.
- बुध ग्रहाला सर्वात वाईट राशी म्हणजे मीन होय. मीन राशी मध्ये बुध असणारी माणसे चंचल मनाची, हलक्या विचारांची व तोंडाळ असतात. बहुत करून अशा माणसांना दारूचे अथवा अन्य कोणते तरी व्यसन असतेच.
- मीन राशीचे खालोखाल कर्क राशीही बुधाला वाईट आहे. या राशी मध्ये बुध असणारी माणसे फार उपद्रवी असतात.
- धनु राशीमध्ये बुध असेल तर ही माणसे मूर्ख, उतावीळ, गर्विष्ठ असतात. अत्तरे व इतर सुगंधी पदार्थाचे शौकीन असतात. बुद्धी थोडी, गर्वफार.
- मेष राशीमध्ये बुध असलेली माणसे फार चौकस असून, त्यांची बुद्धिमत्ता भाषण शैली चांगली असते. ती माणसे अधीर स्वभावाची व रागीट असतात. मेष राशीत बुध असणारे लोक बोलण्यात पटाईत असतात. वादावादीची त्यांना आवड असते.
- वृषभ, वृश्चिक अगर मकर या राशीत बुध असेल तर ती स्वार्थी लोभी दुसऱ्याचा मत्सर करणारी, द्वेषी व लबाड असतात.
- वृश्चिक अगर मकर राशीच्या बुधाचे लोक बुद्धिमान असतात. सिंह राशीत बुध असेलेले लोक सरळ मनाचे व ठाम मताचे असतात.
- मिथुन, कन्या, तुला अथवा कुंभ राशीत बुध असेल तर ती माणसे फार कल्पक स्वतंत्र विचारांची उत्तम, लेखक व वक्ते असतात.
- जन्मकुंडलीमध्ये मंगळ-बुधाचा योग असेल तर जन्मणाऱ्याची बुद्धी फार तीव्र असते. परंतु, तीचा उपयोग चांगले अगर वाईट कृत्यात होईल हे सांगणे कठीण आहे. मंगळ-बुध ह्या दोन ग्रहांची युती असेल तर जन्मणारा फार चपळ, फार रागीट, नेहमी खोटे बोलणारा, अधर्मी व दांभिक असतो.
- जन्मकुंडलीमध्ये बुध-गुरूचा योग असेल तर मनुष्य प्रामाणिक होईल मनुष्याचा स्वभाव रवी व चंद्र यांच्यावर अवलंबून असतो. जर जन्मकुंडलीत रवी-चंद्रा वर गुरूची दृष्टी असेल तर असामनुष्य विशेष उदार नसतो. या योगावर जन्मलेले लोक ज्या कामामध्ये त्यांचे नाव येईल अशाच कृत्यात आपले औदार्य प्रगट करतात.
- रवी-चंद्रावार शुक्राची दृष्टी असेल तर जन्मणारा फार उधळ्या निघतो.
- जन्मकुंडली मध्ये शनी-बुध एकत्र असतील तर अशा योगावर जन्मणारा मनुष्य फार धूर्त व स्वार्थी असतो.
जोतिषविशारद – मानसी पंडित
—————————————————————————————–