बेंगळुरू : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीतील बेंगळुरूतील कथित बोगस मतदार प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधींना आता माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांचा पाठिंबा मिळाला आहे. रावत यांनी स्पष्ट केले की, अशा गंभीर आरोपांवर निवडणूक आयोगाने कोणत्याही तक्रारीची वाट न पाहता चौकशी सुरू करायला हवी.
‘द टेलिग्राफ’शी बोलताना रावत म्हणाले, “ मी मुख्य निवडणूक आयुक्त असताना, कोणत्याही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी गंभीर आरोप केल्यास आम्ही तात्काळ स्वतःहून तपास सुरू करत होतो आणि जनतेसमोर सत्य मांडत होतो. अशा वेळी आम्ही पक्षांकडून आधी औपचारिक तक्रार मागत नव्हतो.”
दरम्यान, राहुल गांधी यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोप केला की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बेंगळुरू सेंट्रल मतदार संघातील महादेवपुरा विधानसभा क्षेत्रात एक लाखांहून अधिक बोगस मतदार होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही मतदारांचे नाव दोन किंवा अधिक मतदान केंद्रांवर नोंदवले गेले होते आणि त्यांनी दोन्हीकडे मतदान केले. अनेकांची वारंवार नोंदणी झाली असून चुकीचे पत्ते दिले गेले, एका खोलीच्या घरात तब्बल ८० मतदार नोंदवले गेले आणि काही मतदार इतर राज्यांतही नोंदणीकृत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.
या मुद्द्यावर काँग्रेसने ८ ऑगस्ट रोजी बेंगळुरूमध्ये आंदोलन केले. त्याच दिवशी सकाळी काही लोकांना मतदार यादी डाउनलोड करण्यात अडचणी आल्याने, काँग्रेस कडून निवडणूक आयोगावर छेडछाडीचा संशय व्यक्त झाला. मात्र, आयोगाने हे आरोप फेटाळले.
निवडणूक आयोगाने ‘ एक्स ’ वर पोस्ट करत राहुल गांधींना आव्हान दिलं की, प्रत्येक कथित बोगस मतदारासाठी शपथ पत्रासह तक्रार नोंदवा किंवा देशाची माफी मागा. कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी ही काँग्रेसला पुरावे सादर करण्याचे आवाहन केले.
राहुल गांधींच्या आरोपांनंतर निर्माण झालेला हा वाद निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत असून, आगामी काळात या प्रकरणामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
——————————————————————————-