मेतके (ता. कागल) : प्रसारमाध्यम न्यूज
सद्गुरू बाळूमामा यांनी १९३२ मध्ये मेतके ( ता. कागल ) येथे रोवलेला १४ फूट उंचीचा दिव्य रणखांब श्रावण महिन्यानिमित्त दर्शनासाठी खुला करण्यात येणार आहे. येत्या शुक्रवारी, २५ जुलै रोजी सकाळी विशेष पूजन होणार असून त्यानंतर रणखांब भाविकांसाठी दर्शनासाठी खुला केला जाईल, अशी माहिती सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टचे कार्याध्यक्ष पापा पाटील-कौलवकर यांनी दिली.
बाळूमामा यांनी एक रणखांब कैलासात आणि दुसरा मेतके येथे असल्याचे सांगितले होते. सध्या रणखांबाच्या संरक्षणासाठी पंचधातूचे आवरण घालण्यात आले आहे. मात्र श्रावणात भाविकांच्या आग्रहास्तव हे आवरण काढून रणखांबाचे दर्शन खुले करण्यात येणार आहे.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष आर. डी. पाटील, सदस्य दयानंद पाटील, बळीराम मगर, बाबासाहेब पाटील, देवाप्पा पुजारी आदी उपस्थित होते. भाविकांची व्यवस्था लक्षात घेता भक्तनिवास आणि अन्नछत्राचीही तयारी करण्यात आली असून सर्व सुविधा सज्ज असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
भाविकांनी या दिव्य रणखांबाच्या दर्शनाचा श्रावण महिन्यात लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
———————————————————————————————–