मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये अखेर महामंडळ वाटपाचा पेच सुटला असून, संख्याबळाच्या आधारे महामंडळांचे वाटप करण्यात आले आहे. भाजपला ४४, शिंदे गटाच्या शिवसेनेला ३३ तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २३ महामंडळे देण्यात आली आहेत. ही माहिती सूत्रांकडून समोर आली असून, नुकत्याच पार पडलेल्या समन्वय समितीच्या बैठकीत हे सूत्र ठरल्याचेही सांगण्यात येते.
‘सिडको’ आणि ‘म्हाडा’साठी रस्सीखेच
महामंडळ वाटपावर एकंदर सहमती झाली असली तरी आता लक्ष लागले आहे ते ‘सिडको’ आणि ‘म्हाडा’सारख्या महत्त्वाच्या महामंडळांकडे. यावर भाजप व शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे लवकरच समन्वय समितीची पुन्हा बैठक होणार असून, त्यात या महामंडळांचे वाटप निश्चित केले जाईल, असे बोलले जात आहे.
निवडणुकांपूर्वी नाराजी शमवण्याचा प्रयत्न
महामंडळ वाटपामागे स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांपूर्वी पक्षांतर्गत नाराजी शमवण्याचा उद्देश असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अनेक नाराज आमदारांनी महामंडळ अध्यक्षपदासाठी लॉबिंग सुरू केल्याचेही समजते. त्यामुळे नियुक्त्यांमुळे पक्षांतर्गत असंतोष कमी होऊन आगामी निवडणुकांत महायुतीला लाभ होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
महामंडळांची अध्यक्षपदे ही केवळ सत्तावाटपाचा भाग नसून, ती पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना आणि लोकप्रतिनिधींना सन्मानित करण्याची संधी असते. यामुळे पक्ष संघटन बळकट होतं, असं निरीक्षण काही नेत्यांनी नोंदवलं आहे.
महायुतीची एकत्र निवडणुक लढण्याची घोषणा
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांबाबत महायुतीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची बैठक रत्नागिरीत नुकतीच पार पडली. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट), शिवसेना (शिंदे गट) आणि अन्य मित्र पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती होती. बैठकीनंतर शिवसेनेकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली.
तिकीट वाटपाचे निर्णय हे वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली घेतले जातील, असेही रत्नागिरी शहर प्रमुख बिपीन बंदरकर यांनी स्पष्ट केले.
राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू
संपूर्ण घडामोडींचा केंद्रबिंदू म्हणजे महायुतीच्या तिन्ही प्रमुख पक्षांतील सुसंवाद आणि ताकदवान लोकप्रतिनिधींच्या सहभागाची खातरजमा. महामंडळांचे वाटप आणि त्यानंतर होणाऱ्या निवडणुका या महायुतीच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरू शकतात, असा अंदाज व्यक्त होत आहे.
——————————————————————————-