कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
करवीर निवासिनी श्री अंबाबाईंच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार असल्याने उद्या सोमवार आणि मंगळवारी देवीचे दर्शन बंद राहील. या काळात भाविकांना देवीच्या उत्सवमूर्ती व श्रीकलशाचे दर्शन घेता येईल. तरी भाविकांनी पिढीतून उंबरठ्याच्या बाहेरून श्रीमुख व श्रीच्या उत्सवमूर्तीचे दर्शन घ्यावे, देवस्थान व्यवस्थापन समितीला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अंबाबाईची मूर्ती सुरक्षित राहावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने प्रशासकीय निर्णय घेतला. या मूर्तीच्या संरक्षणासाठी कोल्हापूर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण नवी दिल्ली (भारत सरकार) यांना कळवले होते. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण येथील अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी व संवर्धन १६ एप्रिल २०२४ मध्ये केले होते. त्यानुसार सुचनेनुसार देवस्थान व्यवस्थापन समितीने १२ जून २०२५ रोजी महासंचालक भारतीय पुरातत्त्व विभाग, नवी दिल्ली (भारत सरकार) यांना मूर्तीची नियमित पाहणी व आवश्यक संवर्धन प्रक्रिया करण्याबाबत कळविले होते. त्यानुसार भारतीय पुरातत्त्व विभाग यांच्यातर्फे श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी व अंबाबाई देवीच्या मूर्तीची पाहणी व आवश्यक नियमित संवर्धन प्रक्रिया उद्या सोमवार व मंगळवारी करण्यात येणार आहे.
म्हणूनच देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन भाविकांना देता येणार नाही. या काळात भाविकांना श्रीची उत्सवमूर्ती व श्रीकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, भाविकांनी पिढीतून उंबरठ्याच्या बाहेरून श्रीमुख व श्रीच्या उत्सवमूर्तीचे दर्शन घेऊन देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर यांना सहकार्य करावे.