नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून, याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियाशी संवाद साधत देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. देशाची घौडदौड, सुरक्षेचा बळकट होत असलेला पाया आणि लोकशाहीचा विजय यांचा त्यांनी ठासून उल्लेख केला.
ऑपरेशन सिंदूरमधून जगाने भारतीय सैन्याचं सामर्थ्य पाहिलं
मोदींनी या संवादात अलीकडेच यशस्वी झालेल्या ऑपरेशन सिंदूरचा विशेष उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की, “ या मोहिमेद्वारे जगाला भारतीय सैन्याचं सामर्थ्य पुन्हा एकदा दिसून आलं. देशातील माओवादी आणि नक्षलवादी कारवायाही आता मर्यादित क्षेत्रांपुरत्या राहिल्या आहेत. जे झोन पूर्वी ‘रेड झोन’ होते, तेच आता ‘ग्रीन झोन’ झाले आहेत. बंदुकीच्या समोर आपल्या संविधानाचा आणि लोकशाहीचा विजय होतोय, याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.”
देश तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेच्या उंबरठ्यावर
अर्थव्यवस्थेचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, “ पूर्वी आपण जगात दहाव्या क्रमांकावर होतो. आता भारत तिसऱ्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था बनण्याच्या दारात आहे. जगभरात प्रत्येक मंचावर भारताची प्रगती स्पष्टपणे दिसतेय. विकासाची दस्तक आता जगाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचते आहे.”
पावसाळ्याचा अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम
गेल्या दहा वर्षांत तीनपट पाणीसाठा वाढल्याचं नमूद करत त्यांनी सांगितलं, ” पाऊस प्रत्येक कुटुंबासाठी महत्त्वाचा आहे. यामुळे शेती, जलव्यवस्थापन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्यामुळे हे अधिवेशन देशासाठी गौरवाचं ठरेल.”
विरोधकांची आक्रमक तयारी
दुसरीकडे, विरोधकांनीही अधिवेशनात सरकारला घेरण्याची भूमिका घेतली आहे. पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला, त्यानंतरचं ऑपरेशन सिंदूर आणि अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला काश्मीरमधील मध्यस्थीचा दावा हे मुद्दे विरोधकांकडून जोरात मांडले जाण्याची शक्यता आहे. विरोधकांनी पंतप्रधानांनी अधिवेशनात उपस्थित राहावं, अशी जोरदार मागणी केली आहे.
२१ बैठकींचं पावसाळी अधिवेशन
हे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होऊन २१ ऑगस्टपर्यंत चालणार असून, एकूण २१ बैठका होणार आहेत. देशभरातून नागरिकांचं आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष या अधिवेशनातील चर्चांवर, निर्णयांवर आणि मोदींच्या उपस्थितीवर राहणार आहे.
——————————————————————————————