मुंबई : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात मोठे वादळ निर्माण केले आहे. या दोन नेत्यांच्या जवळीकीमुळे केवळ विरोधी पक्षाला नवसंजीवनी मिळणार नाही, तर सत्ताधाऱ्यांच्या गोटात अस्वस्थता वाढणार, असा ठाम विश्वास ज्येष्ठ राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
अमित ठाकरे प्रकरण आणि भाजपच्या मनातली खदखद
राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे निवडून येण्याची भाजपने संधी दिली असती, तर भाजपच्या मनात काहीतरी सकारात्मक भाव आहे असे म्हणता आले असते. मात्र, तसे न होता अमित ठाकरे पराभूत झाले आणि ही सल राज ठाकरे यांच्या मनात अजूनही असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मनसेचा भाजपसोबतचा भविष्यकालीन प्रवास फारसा शक्य दिसत नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
ठाकरे बंधू एकत्र आल्यास राजकारणात मोठा बदल
राजकारणात ‘शून्यातून शंभर’ गाठणे शक्य असते आणि हेच ठाकरे बंधू सध्या करणार असल्याचे संकेत आहेत. या दोघांच्या एकत्र येण्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बदल घडेल आणि त्याला सत्ताधारी पक्षांकडून खोडा घालण्याचा जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे राजकीय तज्ञ म्हणतात.
शिवसेनेचे ब्रँड मूल्य आजही कायम
ठाकरे हे फक्त नाव नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. शहरांची नावबदल प्रक्रिया असो वा भाषावार प्रांतरचना, शिवसेनेचे योगदान कोणी नाकारू शकत नाही. त्यामुळे ठाकरे ब्रँड हे आजही लोकांच्या मनात टिकून आहे.
मराठी अस्मिता आणि भाषेचा मुद्दा
भाषावार प्रांत रचना झाल्यानंतरही मराठीसाठी आग्रह धरणे चुकीचे नाही. उलट, आज मराठी शाळांची दुरवस्था, वाचनालयांची गळती ही मराठी समाजासाठी चिंतेची बाब आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने प्रत्यक्षात काही फरक पडत नाही, असे कटू वास्तवही त्यांनी समोर मांडले.
विरोधी पक्षाचा आवाज उभा राहणार
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, तर राज्यात सशक्त विरोधी पक्षाचा आवाज तयार होईल. सध्याची स्थिती पाहता विरोधी पक्ष नेतेपदच देण्याची तयारी सत्ताधाऱ्यांकडे नाही. त्यामुळे जनतेच्या मनातील भावना ठाकरे बंधूंना एकत्र आणत असून, याच जनमताच्या रेट्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा बदल होणाची शक्यता आहे.
मराठी मतांची घटती टक्केवारी आणि भाजपचा हिंदी आग्रह
मुंबईसारख्या शहरात मराठी मतांचा टक्का आता ३० ते ३२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. पूर्वीचे मराठी वर्चस्व कमी होत असून, गुजराती समाजाचे प्राबल्य वाढत आहे. भाजपचे हिंदी भाषिक मतदारांवरचे लक्ष आणि मराठीबद्दलची थंड प्रतिक्रिया ही भाजपसाठी अडचणीची ठरणार आहे, असल्याचे दिसते.
हिंदी प्रकरणावर फडणवीसांचे कारण कमजोर
हिंदीसाठी सक्तीसाठी ज्या पद्धतीने सरकार आग्रही आहेत, ते फारच तकलादू आहे. मुंबई महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्याचे भाजपचे दिव्य स्वप्न आहे, मात्र मराठी मतदार, मुस्लिम समाजातील सॉफ्ट कोप आणि ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे हे स्वप्न सहजसोपे राहणार नाही.
मनसे महाविकास आघाडीसोबत येणार ?
मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने महाविकास आघाडीसाठीही नवी दिशा तयार होणार आहे. मनसेचे महाविकास आघाडीसोबत जाणे हा सध्या कुतूहलाचा विषय असला तरी, एकत्र व्यासपीठावर ठाकरे बंधू, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे दिसले, तर भाजप आणि शिंदे गटासाठी ही मोठी डोकेदुखी ठरेल.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा थेट फटका शिंदे गटाला
मुंबईसह एमएमआरडीए क्षेत्रात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा सर्वात मोठा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बसेल. एकनाथ शिंदे यांच्या साठी मतदान करणारा मराठी मतदार ठाकरे बंधूंच्या एकत्रित लाटेत बदलू शकतो.अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य जवळीकीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. भाजप आणि शिंदे गटासाठी ही परिस्थिती निश्चितच आव्हानात्मक ठरणार आहे. मराठी अस्मिता, भाषिक असंतोष, भाजपच्या हिंदी धोरणाला विरोध आणि मनसेचा पुढील निर्णय यामुळे राज्यात आगामी काळात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलू शकतात.
——————————————————————————————



