गगनयान मोहिमेची मोठी झेप

डिसेंबरमध्ये पहिल्या मानवरहित प्रक्षेपणाची तयारी

0
92
Google search engine
नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ( ISRO ) देशवासियांसाठी मोठी आनंदवार्ता दिली आहे. भारताच्या महत्वाकांक्षी गगनयान मोहिमेत निर्णायक पावले उचलली जात असून यावर्षी डिसेंबर-२०२५ मध्ये पहिले मानवरहित प्रक्षेपण (G १) होणार आहे. या मोहिमेत विशेष आकर्षण ठरणार आहे “ व्योममित्र ” अर्धमानवासारखा दिसणारा रोबोट, जो अंतराळातील परिस्थिती तपासणार आहे.
गेल्या चार महिन्यांत महत्त्वपूर्ण यश
ISRO प्रमुख व्ही. नारायणन यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, गेल्या चार महिन्यांत अनेक प्रयोग यशस्वी ठरले असून त्यातून गगनयानसाठी महत्त्वाची तयारी पूर्ण झाली आहे. सुरक्षित अंतराळ प्रवासासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
ISS अनुभव गगनयानसाठी उपयुक्त
या पत्रकार परिषदेत ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी सांगितले की, त्यांनी नुकतीच यशस्वी अ‍ॅक्सिओम-४ मोहीम पूर्ण केली असून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा (ISS) अनुभव भारताच्या गगनयान मोहिमेसाठी उपयुक्त ठरणार आहे. “ लवकरच आपल्या कॅप्सूल मधून, आपल्या रॉकेटचा वापर करून भारतीयांना अंतराळात पाठवले जाईल. ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची मोहीम ठरेल,” असे शुक्ला म्हणाले.
काय आहे गगनयान ?
गगनयान ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे. या मोहिमेत भारतीय अंतराळवीरांना पृथ्वीच्या समतल कक्षेत पाठवले जाईल. सुरक्षित प्रवास, परतीचा यशस्वी प्रवास आणि अंतराळात भारताचे सक्षम नेतृत्व प्रस्थापित करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
टप्प्याटप्प्याची प्रगती
  • डिसेंबर-२०२५ : पहिले मानवरहित प्रक्षेपण (G१) – व्योममित्रासह
  • त्यानंतर अजून दोन मानवरहित मोहिमा
  • यामध्ये मानवसदृश परिस्थितीत यंत्रणा तपासल्या जाणार
  • २०२७ ( पहिली तिमाही ) : तीन भारतीय अंतराळवीरांचे प्रक्षेपण
  • ही मोहीम साधारणपणे ३ दिवस ते १ आठवड्यापर्यंत चालण्याची शक्यता
२०२७ मध्ये भारतीय पाऊल पहिल्यांदाच अंतराळात पडणार असून, हे भारताच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील सुवर्णपान ठरणार आहे.
—————————————————————————————
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here