जोतिबा डोंगर : प्रसारमाध्यम न्यूज
जोतिबा विकास प्राधिकरणाचा पहिला टप्पा मंजूर झाला असून या टप्प्यासाठी २५९ कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. या प्राधिकरणासाठी वाडी रत्नागिरी ज्योतिबाच्या ग्रामस्थांना विश्वासात न घेतल्यामुळे ग्रामस्थांनी सहमती दर्शवली न्हवती, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामस्थ आणि प्रशासन यांची बैठक होऊन या बैठकी दरम्यान ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजावून घेऊन ग्रामस्थांचं एक शिष्टमंडळ या प्राधिकरणामध्ये समाविष्ट करून घेणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ प्राधिकरणावरील चर्चेसाठी तयार झाले.
ज्योतिबा विकास प्राधिकरणासाठी मंत्रिमंडळ बैठकीच्या निर्णया नंतर पहिल्या टप्प्यासाठी २५९ कोटी ५९ लाख रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. या प्राधिकरणासाठी ग्रामस्थांना विश्वासात न घेता आराखडा तयार केल्याने जोतिबा ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली होती. जोतिबा ग्रामस्थांशी समन्वय साधण्यासाठी आज दुपारी अडीच वाजता खासदार धैर्यशील माने जिल्हाधिकारी अमोल येडगे, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान प्राधिकरणाचा पहिला टप्पा कसा असणार या टप्प्यांमध्ये कोणकोणती विकास काम केली जाणार याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ग्रामस्थांना माहिती दिली.
मंजूर निधी : जोतिबा मंदिर आणि परिसर संवर्धनासाठी – ५५ कोटी रुपये, यमाई मंदिर आणि परिसर संवर्धनासाठी – २५ कोटी रुपये. अशा पहिल्या टप्प्यातील १३ कामांसाठी एकूण २५९ कोटी ५९ लाख रुपये रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या प्राधिकरणाबाबत ग्रामस्थांची सल्लामसलत करण्यात आली नव्हती त्यामुळे ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी प्रशासनाच्या वतीने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकी दरम्यान ग्रामस्थांनी त्यांच्या काही प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडल्या यामध्ये प्राधिकरण करत असताना ग्रामस्थांना विचारात घेऊन प्राधिकरण करावं अशी प्रमुख मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.
या बैठकी दरम्यान ग्रामस्थांनी इतरही काही मुद्दे उपस्थित केले –
- गावाला पाच दिवसातून एकदा पाणीपुरवठा होतोय, पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी काही नवीन उपाययोजना कराव्यात.
- गायमुख तलावजवळ प्रति तलावाची निर्मिती करून पाणीसाठ्याची क्षमता वाढवावी.
- कायमस्वरूपी दवाखाना तसेच क्रीडांगण तयार करावं
- मंदिर आणि तिथल्या धार्मिक आणि पुरातत्त्व वस्तूंच संवर्धन करत असताना मूळ आध्यात्मिक स्वरूपाला बाधा येऊ नये अशा प्रकारची मागणी यावेळी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.
यावेळी प्रशासनाच्या वतीने ग्रामस्थांवर कसल्याही प्रकारचा अन्याय केला जाणार नाही. तसेच प्राधिकरणाचा हा प्राथमिक स्वरूपातील आराखडा असून मुख्य आराखडा तयार करत असताना जोतिबा ग्रामस्थांमधून पाच लोकांचे शिष्टमंडळ प्राधिकरण प्रक्रियेत समाविष्ट करून घेऊ, असे आश्वासन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, पन्हाळा शाहूवाडी चे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे , पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी. जोतिबा देवस्थानचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांच्या सह प्रशासनातले अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
———————————————————————————————-